अपंग विकास महामंडळात १0 वर्षापासून एकही कर्मचारी नाही!
By Admin | Updated: October 15, 2015 02:00 IST2015-10-15T02:00:29+5:302015-10-15T02:00:29+5:30
ओबीसी महामंडळाच्या कर्मचा-यांकडे अतिरिक्त कार्यभार ११ वर्षात ४९३ लाभार्थींंना कर्जवाटप.

अपंग विकास महामंडळात १0 वर्षापासून एकही कर्मचारी नाही!
सुनील काकडे/वाशिम : अपंगांच्या आर्थिक उन्नतीसाठी २00१ साली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ स्थापन झाले; मात्र २00५-0६ पासून महामंडळातील जिल्हास्तरावर असलेल्या कार्यालयांमध्ये एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. ओबीसी महामंडळातील कर्मचार्यांवरच अपंगांच्या कल्याणाचाही भार टाकण्यात आल्याने दोन्हीही महामंडळांचे कामकाज थंडावले आहे. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने ३ डिसेंबर २00१ रोजी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार, अपंग बांधवांना पारदर्शक व तत्पर सेवा मिळणे अपेक्षित होते; मात्र प्रारंभीपासूनच मूळ उद्देशांपासून भरकटलेल्या या महामंडळाने २00५-0६ पासून सर्वच जिल्ह्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करणे बंद केल्यामुळे अपंगांना अपेक्षित मार्गदर्शन अथवा आपल्या अडचणी मांडण्याकरिता जागाच शिल्लक राहिली नाही. १0 वर्षांंपासून सर्व जिल्ह्यांमधील ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे अपंग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. हे अधिकारी दोन्ही महामंडळातील कामाला योग्य न्याय देण्यास असर्मथ ठरले असून कामाच्या, वाढत्या व्यापाने ते पार वैतागले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे दोन्ही महामंडळं अल्पावधीतच पूर्णत: बंद पडतात की काय, अशी भिती वर्तविली जात आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातील कर्जवाटपाच्या किचकट प्रक्रियेमुळे गेल्या ११ वर्षात अमरावती विभागातील केवळ ४९३ अपंग लाभार्थींंना स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य मिळाले. त्यात अमरावती जिल्ह्यातील १८९ लाभार्थींंसह बुलडाणा जिल्ह्यातील १0४, यवतमाळ १0२; तर वाशिम जिल्ह्यातील ९८ लाभार्थींंचा समावेश आहे. यासंदर्भात अमरावती येथील ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश उमक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळात सध्या एकही कार्यालयीन पद भरलेले नसल्याचे सांगीतले. यामुळे गेल्या अनेक वर्षांंपासून ही जबाबदारी ओबीसी महामंडळातील अधिकार्यांनाच पार पाडावी लागत आहे. अशाही स्थितीत वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये काम चांगले करुन दाखविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगीतले.
*यवतमाळच्या अधिका-याकडे वाशिमचा कारभार
यवतमाळ येथील ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक मुकेश उमक यांच्याकडे सध्या वाशिमचाही कारभार सोपविण्यात आलेला आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील ओबीसी आणि अपंग विकास महामंडळाचे कामकाज पाहताना गत कित्येक वर्षांंपासून आजारी रजादेखील मिळाली नसल्याचे दु:ख उमक यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले.