तीन दिवस घरातच डिजिटल अरेस्ट, घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगत शिक्षकाला १३.४४ लाखांचा गंडा

By नरेश रहिले | Updated: January 11, 2025 16:40 IST2025-01-11T16:34:42+5:302025-01-11T16:40:01+5:30

Gondia Crime News: शिक्षकाला तुझ्यावर मुंबई ठाणे येथे एफआयआर दाखल आहे. तू डिजीटल अरेस्ट हो असे सांगून त्याच्या जवळून तब्बल १३ लाख ४४ हजार रूपये वसूल करणाऱ्या भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Digital arrest at home for three days, teacher cheated of Rs 13.44 lakhs, claiming involvement in scam | तीन दिवस घरातच डिजिटल अरेस्ट, घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगत शिक्षकाला १३.४४ लाखांचा गंडा

तीन दिवस घरातच डिजिटल अरेस्ट, घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगत शिक्षकाला १३.४४ लाखांचा गंडा

- नरेश रहिले
गोंदिया - नवेगावबांधच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भोजलाल रामलाल लिल्हारे (५१) रा. लवेरी ता. किरणापूर जि. बालाघाट या शिक्षकाला तुझ्यावर मुंबई ठाणे येथे एफआयआर दाखल आहे. तू डिजीटल अरेस्ट हो असे सांगून त्याच्या जवळून तब्बल १३ लाख ४४ हजार रूपये वसूल करणाऱ्या भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सायबर लुटारूंच्या जाळयात अडकलेल्या शिक्षक लिल्हारे यांनी स्वत:ला तीन दिवस घरातीलच खोलीत डांबून ‘डिजीटल अरेस्ट’ सुध्दा दिला आहे. या प्रकरणात फवसणूक करणाऱ्या आरोपीवर नवेगावबांध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर तालुक्याच्या लवेरी येथील भोजलाल रामलाल लिल्हारे (५१) हे गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मोबाईलवर २६ डिसेंबर रोजी एका मोबाईलने व्हॉट्सॲप कॉल आला. पीओ प्रकाश अग्रवाल क्राईम ब्रांच मुंबईवरून बोलतो असे सांगत त्याने मुंबई ठाणे येथे आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या नावावर कॅनरा बॅंकेत खाते काढून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने दोन कोटी रूपये त्या खात्यातून फ्राड केले. या प्रकरणात आपण १४८ वे संशयीत व्यक्ती आहात असे सांगून त्याचे २० टक्के कमीशन आपल्याला दिला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व खात्यांची माहिती द्या. ही गोष्ट कुणाला सांगू नका अन्यथा आपल्या कुटुंबाला जीवाचा धोका होईल असे सांगून त्याच्या जवळून तीन दिवसात १३ लाख ४४ हजार रूपये लुटले. आरोपीवर नवेगावबांध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३६ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३४० (२), २०४ ३५१ (२) सहकलम ६६ डी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस निरीक्षक चाफले करीत आहेत.
 
राष्ट्रीय मुद्दा आहे कुणाला सांगू नका
भोजलाल रामलाल लिल्हारे (५१) यांना लुटणाऱ्या सायबर आरोपीने लिल्हारे यांच्या सर्व खात्यांची माहिती घेतली. त्याची तपासणी होईल आणि आपल्याला आपला पैसा परत केला जाईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. परंतु ही गोष्ट कोणाला सांगू नका अन्यथा आपल्या कुटुंबाला धोका होऊ शकतो असे सांगत हा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दा आहे असे सांगून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला सांगितले.
 
तीन दिवसात चार ट्रान्जेक्शन
२६ डिसेंबर रोजी ५ लाख रूपये, २७ डिसेंबर रोजी ४ लाख ६८ हजार, नंतर ९९ हजार २८ डिसेंबर रोजी २ लाख ७७ हजार अो चार ट्रान्जेक्शन मधून १३ लाख ४४ हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करवून घेतले.
 
८० हजार गोठवले
शिक्षक भोजलाल लिल्हारे याने १३ लाख ४४ हजार रूपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सायबर क्रीमीनलच्या सांगण्यावरून स्वत:च्याच खोलीत त्यांनी डिजीटल अरेस्ट करून घेतले. त्यामुळे चोरट्याने ऑनलाईन ट्रान्सफर केलेली रक्कम पोलिसांना गोठवता आली नाही. त्यांनी माहिती दिल्यानंतर फक्त ८० हजार रूपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. वेळेत त्यांनी पोलिसांना सूचना दिली असती तर त्यांचे लाखो रूपये गोठवता आले असते.
 
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ट्रेडिंगच्या बहाण्याने, कोड स्कॅन करायला सांगून, कारवाईची भीती दाखवून अशा अनेक प्रकारच्या बहाण्याने सर्वसामान्यांपासून ते गर्भश्रीमंतांना गळाला लावले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला अथवा कारवाईच्या धमक्यांना बळी पडू नये.
- योगिता चाफले, पोलीस निरीक्षक नवेगावबांध.

Web Title: Digital arrest at home for three days, teacher cheated of Rs 13.44 lakhs, claiming involvement in scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.