उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी? शरद पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:50 IST2025-01-24T09:47:56+5:302025-01-24T09:50:45+5:30
Sharad Pawar : उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी? शरद पवारांचा सवाल
कोल्हापूर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दोन दिवसांपूर्वी दावोस दौऱ्यावर होते. त्यावेळी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. या दाव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावरून उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार काल (दि.२३) एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, शुक्रवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे दावोस येथील विधान मी ऐकले. उद्योगमंत्री दावोस येथे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी? त्यांनी दावोस येथून जी काही विधाने केली, ती पाहता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता, त्याच्याशी सुसंगत नव्हती.
याचबरोबर, मुख्यमंत्री असताना मी देखील दावोसला गेलो होतो आणि अनेक कंपन्यांशी करार केले होते. पण, काल करार झालेल्या कंपन्या महाराष्ट्रात आधीपासूनच आहेत. याचाच अर्थ गुंतवणूक करण्याचे आधी ठरवले, मग त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करण्यात आले. त्यानंतर तिथून त्यांना महाराष्ट्रात आणले असा दिखावा करण्यात आले. गुंतवणुकीचे वातावरण तयार करायची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाचा बीकेसीत तर उद्धव ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा पार पडला. यावर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने अधिक गर्दी होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तसेच, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतल्याचे सांगत पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे त्यांचे मत असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल असे ते म्हणाले.
याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत सु्द्धा शरद पवार यांनी भाष्य केले. अमित शाह हल्ली जे काही बोलतात याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाने सतत घेतली आहे. त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत टोन हा अति टोकाचा आहे. हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. त्यामुळे अमित शाह हे कोल्हापुरात शिकले की, आणखी कुठे शिकले? हे मला माहिती नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.