कुजबुज! भाजपा आमदार मराठी विसरले का?; महापालिकेला इंग्रजीतून पाठवले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:34 IST2025-02-13T06:34:28+5:302025-02-13T06:34:58+5:30
या इंग्रजी पत्रव्यवहाराला उद्धवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.

कुजबुज! भाजपा आमदार मराठी विसरले का?; महापालिकेला इंग्रजीतून पाठवले पत्र
ठाणेकरांना ‘दिल्ली’ने वगळले?
दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे ठाण्यातील ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांना निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे दिल्लीने ठाणेकर साहित्यिकांना वगळल्याची चर्चा सुरू आहे. आधी झालेल्या साहित्य संमेलनाचे बागवे यांना निमंत्रण होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वशिलेबाजी आवडते. त्यांची जे स्तुती करतात त्यांना व्यासपीठ देतात. मस्का मारून नमस्कार करण्याऱ्यांमधील मी नाही, असे बागवे म्हणाले. मला न बोलवून त्यांचे नुकसान होत आहे. माझे नाही, असेही बागवे म्हणाले.
आयलानी मराठी विसरले काय ?
शासकीय व निमशासकीय कार्यालयांना मराठीतून पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले आहेत. उल्हासनगरातील आ. कुमार आयलानी यांनी महापालिका आयुक्तांना इंग्रजीत पत्र पाठवून अभय योजना लागू करण्याची मागणी केली. इंग्रजी म्हणजे या इंग्रजी पत्रव्यवहाराला उद्धवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. आयलानी आमदार झाले तेव्हा, त्यांनी आमदार पदाची मराठीतून शपथ घेतली होती. मराठी शिकत असल्याचे सांगितले होते. गेल्या १५ वर्षांत आयलानी यांना मराठी येऊ लागले की नाही, अशी कुजबुज सुरू आहे.
ठाणेकरांचे पहिले प्रेम मराठीवर...
ठाण्यातील ‘आनंदोत्सव संगीत समारंभ २०२५’च्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची मुलाखत आयोजित केली होती. मुलाखत रंगात आली असतानाच त्यांनी स्टेजसमोर येऊन उभे राहत ‘दम मारो दम’ या गाण्याच्या ओळी सादर केल्या. त्यावेळी आशाताईंनी प्रश्न केला की, हिंदी गाण्याचा प्रभाव जास्त आहे ना? त्यावर उपस्थित ठाणेकर म्हणाले की, आम्ही ठाणेकर आहोत. आमचे पहिले प्रेम हे मराठी गाण्यांवर आहे. ठाणेकरांच्या या प्रतिक्रियेनंतर आशाताईंनी ‘दम मारो दम’ आवरते घेतले आणि पुन्हा मुलाखत सुरू झाली. त्यानंतर त्यांनी काही मराठी गीते सादर करून ठाणेकर कानसेनांची इच्छा पूर्ण केली.
... आणि घरापर्यंत पोहोचले ‘राजे’ !
लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘छावा’ चित्रपटाच्या रूपात धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र सर्वदूर पोहोचवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. चित्रपट सुरू केल्यानंतर हळूहळू विकीच्या अंगात ‘राजे’ असे काही भिनले की, ते थेट त्याच्या घरापर्यंत पोहोचले. बोलण्यापासून चालण्यापर्यंत सर्वच बाबतीत विकीने स्वत:ला ‘राजे’ बनवले. त्याचे चालणे बदलले आणि तो शांत राहू लागला. ही गोष्ट पत्नी कतरीनाच्याही लक्षात आली. आपले चालणे बघून ‘यह बहुत सही लग रहा है’, असे कतरीना म्हणाल्याचे विकीने सांगितले. ही सर्व लक्षणे विकीच्या अंगात ‘राजे’ भिनल्याची असल्याची चर्चा आहे.