धुळ्यात मोठी घटना समोर आली आहे. धुळ्यात अंदाज समितीच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे, या दौऱ्यासाठी ११ आमदारधुळे शहरात दाखल झाले आहेत. या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये शासकीय विश्रामगृहाच्या १०२ नंबरच्या खोलीत ठेवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. तसेच या खोलीला कुलूप लावत जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत ती खोली उघडण्याची मागणी केली होती. ही खोली उघडताच आतमध्ये नोटांच्या थप्प्या सापडल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे हे खोली क्रमांक 102 बाहेर ठाण मांडून बसले होते. अंदाज समिती मधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच खोलीला कुलूप ठोकल्यानंतर त्यांनी पाच तास तिथेच ठिय्या मांडला होता. ही खोली अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावाने बुक होती.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसुलच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्यात आली. यावेळी या खोलीत १ कोटी ८४ लाख रुपये सापडले आहेत. या खोलीचे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला. रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. पहाटेपर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरु होते. आता धुळे पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
उर्वरित रक्कम कुठे गेली?
गोटे यांच्या दाव्यानुसार पाच कोटी रुपये सापडले नसले तरी सुमारे १.८४ कोटी रुपये सापडले आहेत. यामुळे उर्वरित रक्कम कुठे गेली असा सवालही उपस्थित होत आहे. गोटेंनी खोलीला टाळे ठोकण्यापूर्वीच कोणाला पोहोच केली गेली का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती नेतृत्व करणारे आमदार अर्जुन खोतकर यांनी आमदारांना हे पैसे देण्यासाठी आणले होते हे आरोप फेटाळले आहेत. आपला पीए त्या खोलीत राहत नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे रचले गेल्याचा आरोपही खोतकर यांनी केला आहे.