जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 12:19 IST2025-08-31T12:17:26+5:302025-08-31T12:19:50+5:30
गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे

जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
बालाजी आडसूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब (जि. धाराशिव): विद्यार्थी, गुरुजन, गावकरी यांचे केवळ ‘शिक्षण’ हेच एक ध्येय अन् त्या व्यवस्थेला बळ देणं हीच आत्मीयता असेल, तर ‘निकाल’ नक्कीच यशदायी निघतो. याचाच प्रत्यय गौर जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत दिसून येत आहे. येथे आजूबाजूच्या गाव-शेत वस्त्यांतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘पायपीट’ थांबविण्यासाठी ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
गौर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २१७ विद्यार्थी आहेत. यात लगतच्या अवधूतवाडी, भोसा या गावांतील व माळी वस्तीवरील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बहुतांश कष्टकरी कुटुंबातील असून, ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार न करता दररोज किमान २ ते ३ किलोमीटर अंतराची पायपीट करीत गौर गावातील शाळा गाठतात.
गरजू मुलांना केले वितरण
विद्यार्थ्यांची पायपीट लक्षात घेऊन शिक्षकांनी पुढाकार घेत मुलांना लोकवर्गणीतून सायकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीला सोबत घेत बैठका घेऊन निधी संकलन करून ४० सायकली खरेदी केल्या.
त्यांचे वितरणही जि. प.चे सीईओ मैनाक घोष व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. सायकल बँकेची संकल्पना मांडताच बोटावर मोजण्याइतपत दिवसात तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांची लोकवर्गणी
जमा झाली.
अशी चालणार बँक...
शाळेमध्ये बाहेर गावांवरून येणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी एक सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सायकलला नंबरिंग असेल. तसेच ती शाळेची मालमत्ता राहणार आहे. सायकल स्टॅण्डची उभारणी. दिवाळी, उन्हाळी सुट्टीत सायकल शाळेतील स्टॅण्डला जमा करणे बंधनकारक. इयत्ता पाचवीमध्ये नव्याने दाखल होताच सायकल विद्यार्थ्याच्या हाती पडणार. सातवी होताच शाळेतून मिळालेली सायकल पुन्हा जमा करावी लागणार आहे.