सांगलीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धुमश्चक्री
By Admin | Updated: June 10, 2016 04:56 IST2016-06-10T04:56:27+5:302016-06-10T04:56:27+5:30
भुकेने कासावीस झालेल्या कार्यकर्त्यांचा संयम सुटून जेवणासाठी दोन गटात जुंपली आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले

सांगलीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धुमश्चक्री
सांगली : राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात भुकेने कासावीस झालेल्या कार्यकर्त्यांचा संयम सुटून जेवणासाठी दोन गटात जुंपली आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. हातात दांडकी आणि खुर्च्यांची फेकाफेकी करुन कार्यकर्त्यांनी एकमेकांना चोपून काढले. या धुमचक्रित दोन कार्यकर्ते जखमी झाले. भुकेल्या कार्यकर्त्यांचा हा रुद्रावतार बघून माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्यावर भाषण थांबून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली.
आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त स्नेहभोजनही होते. दुपारी बारा वाजता मेळावा सुरू होणार होता, पण कार्यकर्ते सकाळी दहापासूनच उपस्थित होते. जयंतराव दुपारी तीन वाजता कार्यक्रमस्थळी आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते. नाट्यगृहाच्या आवारातही कार्यकर्ते थांबून होते. मेळाव्याच्या अंतिम टप्प्यात चारच्या सुमारास पाटील यांचे भाषण सुरू होते. हे भाषण संपल्यानंतरच सर्वांनी स्नेहभोजन घ्यावे, अशी सूचना संयोजकांनी केली होती. मात्र भुकेने कासावीस झालेल्या कार्यकर्त्यांना आणखी धीर धरता आला नाही. पाटील यांचे भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी बाहेर येऊन आचाऱ्यास जेवण वाढण्याची विनंती केली. पण त्याने नकार दिला. काही कार्यकर्त्यांनी या आचाऱ्याला तेथून हटवून जेवणाच्या व्यवस्थेचा ताबा घेतला. जेवण घेण्यासाठी एकच गर्दी झाली. यातून एकमेकांना धक्काबुक्की व चेंगराचेंगरी सुरू झाल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. जेवण वाढून घेतलेली ताटे भिरकावून देण्यात आल्याने मारामारीचे स्वरूप वाढत गेले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांना आवरले. तोपर्यंत शहर पोलिसही दाखल झाले
होते. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद
नव्हती. (प्रतिनिधी)
>गटबाजीची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून वाद रंगला होता. शहराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मेळाव्यातही इच्छुकांची भाषणे होताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. या गटबाजीतूनच दोन गटात हाणामारी झाल्याची चर्चा रंगली आहे.
एक बेशुद्ध : एका कार्यकर्त्याला लाकडाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. त्याला उपचारासाठी कोठे दाखल केले, याची माहिती मिळू शकली नाही.