Anjali Damania Dhananjay Munde News: संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळेधनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बराच कालावधी लोटला असला, तरी मंत्रालयातील त्यांच्या नावाची पाटी मात्र कायम आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट शेअर करत अंजली दमानियांनी महायुती सरकारला सवाल केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयाबाहेरील पाटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पाटीवर धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे यांचे नाव आहे. खाली मंत्री असाही उल्लेख आहे.
वाचा >>आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, "धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी?", असे दोन सवाल सरकारला केले आहेत.
धनंजय मुंडेंनी ४ मार्च रोजी दिलेला राजीनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडाचे नाव आले. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभर जनक्षोभ उसळला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे अजित पवार आणि इतर नेत्यांनी म्हटले होते.
दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी मात्र, राजीनामाच्या दुसरेच कारण सांगितले होते. आपण प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचा राजीनामा झाल्यानंतरही मंत्रालयात त्यांच्या नावाची पाटी कायम आहे. त्यावर आता अंजली दमानियांनी आक्षेप घेतला आहे.