Dhananjay Munde News: माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत सुनील तटकरे यांची वडिलकीची साथ व भक्कम पाठबळ मला लाभले आहे. देशाच्या संसदेत काम करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन तटकरे यांनी आजवर काम केले, त्याच हिरीरीने आणि विश्वासाने पक्षात नवतरुण चेहऱ्यांना संधी देत पक्षाला एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की, त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावे. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. चुकलो नाही तर चांगलेच आहे. पण आता रिकामे ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात ते बोलत होते. मला यापूर्वी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. खरेतर त्यावेळी सुनील तटकरे हे विरोधी पक्षनेते होणार होते. परंतु, त्यांनी मन मोठे करून ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्यासारखे असंख्य तरुण उभे आहेत ते फक्त सुनील तटकरे यांच्यामुळेच, असे सांगत धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले.
धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते. आता, ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, धनंजय मुंडेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावर सुनील तटकरेंनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी काहीतरी काम द्या, अशी मागणी केली. तर, याबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.