"दिवसातून दोनदा माझ्यावर खोटे आरोप"; अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे उचलणार मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:53 IST2025-02-04T19:15:59+5:302025-02-04T19:53:05+5:30
अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

"दिवसातून दोनदा माझ्यावर खोटे आरोप"; अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे उचलणार मोठं पाऊल
Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण लावून धरत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. यावर आता धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत होत्या. त्यानंतर आता धनंजय मुंडे हे अंजली दमानिया यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार आहेत. यासंदर्भात धनंजय मुंडे हे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टमधून ही माहिती दिली आहे. अंजली दमानिया यांनी दिवसातून दुसऱ्यांदा माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
"अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे," असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 4, 2025
कोर्ट धनंजय मुंडेंवरच ताशेरे ओढेल - अंजली दमानिया
धनंजय मुंडे यांच्या पोस्टनंतर अंजली दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "धनंजय मुंडे आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा, ह्यात तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल ह्यात मला काडीमात्र शंका नाही. मी वकील पण लावणार नाही, स्वतः ही केस हायकोर्टात लढेन," असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नॅनो युरीओ, नॅनो डिएपी, बॅटरी स्पेअर, कापूस गोळा करण्याच्या बॅगा यासारख्या ५ गोष्टींचे दर वाढवून त्या गोष्टी शासनाने खरेदी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला."तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढले गेले त्यात नॅनो युरिया ९२ रुपयांना मिळणारी बॉटेल २२० रुपयांना खरेदी केली गेली. १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटेल दुपटीपेक्षा अधिक दराने खरेदी केल्या. नॅनो डिएपीच्या १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटेल ५९० रुपयांना खरेदी केली. ज्याची बाजारभाव किंमत २७९ रुपये होती. या दोन गोष्टी मिळूनच ८८ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला," असं अंजली दमानिया यांनी म्हटलं.