अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडे बरसले; "फक्त सनसनाटी निर्माण करून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:25 IST2025-02-04T15:24:11+5:302025-02-04T15:25:01+5:30
माझं चॅलेंज आहे अंजली दमानियांनी बदनामिया करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडे बरसले; "फक्त सनसनाटी निर्माण करून..."
मुंबई - माझ्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाचं मी खंडन करतो. त्यांनी केलेले आरोप पूर्णत: खोटे आहेत. त्यांनी आत्मचिंतन करायला हवं. आजपर्यंत दमानिया यांनी केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले ते त्यांनी पाहावे. केवळ स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यापलीकडे यात काही नाही. ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ती संपूर्ण प्रक्रिया शासकीय नियम आणि धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आली आहे. मागील ५० दिवस त्या वेगवेगळ्या आरोप करतायेत. दुसऱ्याला बदनाम करणे, स्वत:ची प्रसिद्धी यासाठी केलेले हे आरोप आहेत असा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केला.
पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी दमानियांनी केलेले आरोप खोडून काढले. धनंजय मुंडे म्हणाले की, डीबीटी कोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या आणि वगळायचा अधिकार कृषीमंत्री, मुख्यमंत्री यांचे असतात. या निविदा प्रक्रियेतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मान्यतेने प्रक्रिया अंतिम केली आहे. अंजली दमानिया शेतकरी आहेत की नाही माहिती नाही. पेरणी आणि त्यानंतरच्या कार्यासाठी लागणाऱ्या बाबी मान्सूनपूर्व तयारी करून ठेवाव्या लागतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, जून महिन्यातील पेरणी हंगाम लक्षात घेता सदर प्रक्रिया मार्च महिन्यात केली असं त्यांनी सांगितले.
तसेच नॅनोच्या खताच्या किंमती देशभरात एकच आहे. त्यापेक्षा कमी दरात इथं खरेदी केली गेली. नॅनोमुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते. त्यात कुठलाही खोटेपणा, भ्रष्टाचार झाला नाही. मला बदनाम करण्याचं काम केले जातेय. जी निविदा प्रक्रिया राबवली ती पूर्वमान्यतेने राबवली गेली. जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावं यासाठी निविदा प्रक्रियेला २ वेळा मुदतवाढ दिली. स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी यासाठी हे केले. नॅनो खताच्या किंमती देशभरात एकच असल्याने यात तफावत असणे म्हणणं हे फसवणुकीसारखं आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता विश्वासर्हता राहिली नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत दमानिया यांना ठरवून सरकारने करायची? त्यांनी ठरवलेली किंमत आणि खरेदी यात तफावत आढळली तर भ्रष्टाचार असं म्हणायचं का असा सवाल धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांना विचारला.
दरम्यान, आज ५९ वा दिवस आहे. मीडियात फक्त मी आणि मी आहे. त्यात अंजली दमानिया यांनी बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम केले, जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर मला त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झालाय म्हणणं हा खोटेरडापणा समोर आला. माझं चॅलेंज आहे अंजली दमानियांनी बदनामिया करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
पुन्हा राजकारणात यायचं असेल तर...
अंजली दमानियांना बहुतेक पुन्हा राजकारणात यायचं असेल, त्यासाठी न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी ते अशाप्रकारचे आरोप करतायेत. खोटे धादांत आरोप करू नका. आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका. मीडियात यायचं, स्वत:चा प्रभाव निर्माण करणे अवघड नाही. बीड जिल्ह्यात अतिसंवेदनशील घटना घडलीय. त्या घटनेतील दोषींना फासावर लटकवणे ही आमची जबाबदारी आहे. अंजली दमानियांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचं काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना आणि अंजलीताईंना माझ्या शुभेच्छा आहेत असा खोचक टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.