शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘धुडगूस’

By admin | Published: July 23, 2016 04:04 AM2016-07-23T04:04:48+5:302016-07-23T04:04:48+5:30

करावीला आॅफलाईन प्रवेश मिळावा देण्याच्या नावाखाली काही दलाल शिक्षण उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावणी देत असल्याचे निदर्शनास आले

'Dhagas' in the Deputy Director's Education Department | शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘धुडगूस’

शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘धुडगूस’

Next


मुंबई : अकरावीला आॅफलाईन प्रवेश मिळावा देण्याच्या नावाखाली काही दलाल शिक्षण उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावणी देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी पालकांनी अशा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन कार्यालयाने केले आहे. शिवाय अकरावी प्रवेशाचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर झाले असून लवकरच त्याबद्दलची सविस्तर माहितीही देण्यात येईल, असे उपसंचालक कार्यालयाने सांगितले.
अकरावीला आॅनलाईन प्रवेश घेण्यासाठी आवश्यक नोंदणी अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज अर्धवट भरल्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागले होते. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी मनपसंत महाविद्यालय मिळाले नाही, म्हणून गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेश निश्चित केला नव्हता. तर काही विद्यार्थ्यांनी राहत्या घरापासून दूरवर महाविद्यालय मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा खुली केली आहे. मात्र वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर माहिती मिळत नसल्याने पालकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपसंचालक कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. गर्दीला आवरणे कठीण झाल्याने काही काळासाठी उपसंचालक कार्यालयाचे दरवाजेही बंद करण्यात आले. (प्रतिनिधी)
>...म्हणून दलालांची गर्दी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी प्रथमच १०० टक्के अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने पार पडत आहे. त्यामुळे याआधी आॅफलाईन प्रक्रियेद्वारे पैशांच्या जोरावर श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश करून देणाऱ्या अनेक दलालांच्या पोटावर पाय पडला आहे. यामध्ये काही महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.असे कर्मचारी आणि दलाल पालकांची दिशाभूल करून त्यांना दाद मागण्यासाठी उपसंचालक कार्यालयात धाडत आहेत. त्यामुळे पालकांनी अशा भ्रष्ट कर्मचारी आणि दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. शिवाय याच कारणासाठी उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावण्यासाठी दलाल गर्दी करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
>उपसंचालक कार्यालयाचे पालकांना आवाहन...
पहिल्या टप्प्यात गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता, त्यांच्यासाठी त्याच महाविद्यालयात जागा आहे का? याची माहिती कार्यालय घेत आहे. तसेच जागा रिक्त असल्यास संबंधित विद्यार्थ्याला २५ जुलै रोजी मोबाईलवर आणि विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नव्हता किंवा अर्धवट अर्ज भरला होता, त्यांना ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान अर्ज भरण्याची आणखी एक संधी दिली जाईल. यावेळी विद्यार्थ्याला अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे.

Web Title: 'Dhagas' in the Deputy Director's Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.