Devendra-Uddhav together in Pune on Monday; Coalition meeting | देवेंद्र-उद्धव सोमवारी पुण्यात एकत्र; युतीची संयुक्त बैठक

देवेंद्र-उद्धव सोमवारी पुण्यात एकत्र; युतीची संयुक्त बैठक

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या सोमवारी (दि. १८) पुण्यात एकत्र येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यादिवशी होत असून, दोघेही लोकसभा निवडणुकीचा प्रचार व अन्य अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. युती झाल्यानंतर पुण्यात प्रथमच अशी संयुक्त बैठक होत आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात ही बैठक होईल. पुण्यासह सोलापूर, बारामती, माढा, शिरूर, मावळ, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांतील दोन्ही पक्षांचे संघटनात्मक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना बैठकीसाठी बोलावले आहे. राज्यात सत्ता आल्यापासून साडेचार वर्षांत या दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमेकांबरोबर अजिबात सख्य राहिलेले नाही. आधी लहान भाऊ म्हणून शिवसेनेबरोबर कायम शांतपणे राहणाºया भाजपाच्या पदाधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनीही केंद्रात, राज्यात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नेहमीच पाण्यात पाहिले आहे अशी शिवसेनेची तक्रार आहे.
असे सुरू असल्यामुळेच स्वबळाचा नारा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिला जात होता, मात्र युतीचा निर्णय झाला. आता त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाºयांमधील हा दुरावा दूर करण्यासाठी म्हणून ही संयुक्त बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्र्यांनीच तसा आग्रह धरल्यामुळे ही बैठक होत आहे.

दुरावा विसरा व कामाला लागा असा संदेश यातून देणार आहे. तसेच कार्यकर्त्यांचेही स्थानिक स्तरावर मनोमिलन करून घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. युतीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक असलेले गिरीश बापट व डॉ. नीलम गोºहे या संयुक्त बैठकीचे आयोजक आहेत.

सहानुभूतीने वागवण्याची होती अपेक्षा
पुणे महापालिका हे याचे उत्तम उदाहरण आहे. पालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपाने शिवसेनेच्या ९ सदस्यांना कधीही विश्वासात घेतलेले नाही. निवडणूकच स्वतंत्रपणे लढल्यानंतर सत्तेत वाटा देण्याचा प्रश्नच नव्हता, मात्र किमान सहानुभूतीने तरी वागवले जावे अशी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची अपेक्षा होती. पण भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ती कधीही पूर्ण केलेली नाही.
शिवसेनेनेही कायम पालिकेतील भाजपाच्या सत्तेच्या विरोधात आंदोलनांचा झेंडा फडकता ठेवला आहे. इतकेच काय, पण शिवसेनेने भाजपाचे नेते व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याही विरोधात आंदोलन छेडले होते. थोड्याफार फरकाने पश्चिम महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी अशीच स्थिती आहे.

Web Title: Devendra-Uddhav together in Pune on Monday; Coalition meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.