Devendra Fadnavis target state government and says Pawar's responsibility for defense; | हात झटकण्यात सत्ताधारी तरबेज, पवारांकडे ‘डिफेन्स’ची जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा 

हात झटकण्यात सत्ताधारी तरबेज, पवारांकडे ‘डिफेन्स’ची जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा 


उस्मानाबाद/लातूर : सत्ताधाऱ्यांत प्रचंड मतभेद आहेत. मात्र, हात झटकण्याच्या बाबतीत ते एकसुरी आहेत़ काही झाले तरी केंद्राने करावे, हा त्यांचा सूर, मदत जाहीर करायचे सोडून जीएसटी परताव्यावरुन कांगावा करीत सुटलेत. तर शरद पवार सध्या त्यांच्या ‘डिफेन्स’ची जबाबदारी सांभाळत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नुकसान पाहणी दौºयावर आलेल्या फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी उस्मानाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टीने पिके तर गेलीच, शेतीही खरवडून गेली आहे. दीर्घकालीन नुकसानीच्या भरपाईसाठी विशेष योजना जाहीर केली पाहिजे़ ही वेळ राजकारणाची नाही, संवेदनशीलता दाखविण्याची आहे.

केंद्र सरकार निश्चितच चांगली मदत करेल, पण राज्य सरकारनेही मदत तातडीने जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही फडणवीस म्हणाले. जलयुक्तची चौकशी लावून आमचे तोंड सरकार दाबू शकत नाही.

६ लाख कामे झाली़ त्यात केवळ ७०० तक्रारी आल्या. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यांनी जरुर चौकशी करावी, असेही फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

करुन दाखवण्याची मुख्यमंत्र्यांना संधी...
मागच्या पुराच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी २५ हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच मागणी होती. ते नेमके काय बोलले होते, याचे व्हिडीओच दाखवत फडणवीस यांनी आता आपण सत्तेत आहात, त्यामुळे बोललेले करुन दाखविण्याची संधी आहे. ती दवडू नका, अशी कोपरखळी मारली.

कर्ज काढण्यात गैर काय?
शरद पवारांच्या इतका जाणकार माणूस राज्यात नाही़ त्यांना सर्व नियम, कायदे चांगले ठाऊक आहेत़ तरीही ते मदतीसाठीची प्रक्रिया सांगत आहेत. कर्ज काढावे लागेल, असे म्हणताहेत. मग अशा संकटकाळात कर्ज काढण्यात गैर काय? राज्याची पत १ लाख २० हजार कोटी कर्ज घेण्याची आहे़ त्यामुळे जरुर कर्ज काढावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devendra Fadnavis target state government and says Pawar's responsibility for defense;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.