शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:16 IST2022-08-10T19:15:40+5:302022-08-10T19:16:41+5:30
सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवर मोठे भाष्य केले आहे. सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाण्यात लोकमतच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी, सुशील मोदी यांच्याच सुरात सूर मिळवत फडणवीस म्हणाले, ते अगदी बरोबर बोलले आहेत. बिहारमध्ये आमचे (भाजप) 75 लोक निवडून आले आणि आरजेडीचे 42 लोक निवडून आले. तरीही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे बाजप कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली, असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवारांवर भाष्य करता फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी पक्ष बदलले, तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता. आता आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत. शरद पवारांचे दुःख वेगळे आहे आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
नितीश कुमार वेळीच सावध झाले -
निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.