Devendra Fadnavis on Marathi speaking, Sushil Kedia: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधान केले आहे. 'मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा', असे केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
"महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यावर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की, मी तमिळ शिकली पाहिजे. तमिळ हे चांगली भाषा आहे. पण मला कोणी दुराग्रह करू शकत नाही. मला जर मराठीत बोलायचं असेल तर मी मराठीत बोलेन. पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करत असेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात, भारतात राहतो. आपल्या बाजूच्या भाषा आणि आपल्या बाजूची राज्यं ही पाकिस्तान नाहीत. इतकी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केडिया काय म्हणाले होते?
सोशल मीडिया एक्स वरील आपल्या अकाउंटवरून राज ठाकरे यांना टॅग करत सुशील केडिया यांनी लिहिले होते, "गेली ३० वर्षे मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला?" असे थेट आव्हानच सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिले.