"राजकीय व्यंग करा, टाळ्या वाजवून दाद देऊ, पण.."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:24 IST2025-03-25T13:18:41+5:302025-03-25T13:24:55+5:30
"सुपाऱ्या घेऊन बदनामी कराल तर सोडणार नाही"; कुणाल कामरा प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद

"राजकीय व्यंग करा, टाळ्या वाजवून दाद देऊ, पण.."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कुणाल कामराने माझ्यावर, एकनाथ शिंदेंवर राजकीय व्यंग करावे. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ; पण, कोणी जर अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन बदनामी करीत असेल तर मात्र सोडणार नाही, त्याच्यावर नक्की कठोर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावून सांगितले. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही नेत्यांवर एका कार्यक्रमात केलेल्या कविता व विधानांचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. विधान परिषदेचे कामकाज गदारोळामुळे तीन वेळा तर विधानसभेचे कामकाज एक वेळा तहकूब करावे लागले.
विधानसभेत शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांनी कामरांच्या विधानांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही हास्य व्यंग याचा पुरस्कार करणारे आहोत. राजकीय व्यंग असले तरी त्याला दुसरा रंग देण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आहोत. पण, हे स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे जाणार असेल तर ते मान्य करू शकत नाही.
‘...तोपर्यंत त्याचा मास्टरमाइंड कळणार नाही’
- खोतकर म्हणाले की, शिंदे हे लोकनेते आहेत. ‘अनाथांचा नाथ’ म्हणून त्यांची ओळख आहे. पंतप्रधानांनीदेखील ‘कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या काळात मिळाला,’ असा त्यांचा गौरव केला. शरद पवार यांनीदेखील त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक जाहीररीत्या केले आहे. हा कामरा हिंदू देवीदेवतांचा अपमान करतो. त्याच्या विधानामुळे राज्यात दंगली घडू शकतात. त्याच्या मुसक्या आवळल्या नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्याला वेळीच आवरा. त्याला जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत त्याचा मास्टरमाइंड कळणार नाही.
- खोतकर यांच्या विधानानंतर सत्तारूढ आमदार आक्रमक झाले. गदारोळात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
‘वादग्रस्त बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास’
- मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या विरोधात मग ते पंतप्रधान असोत वा न्यायाधीश-न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात खालच्या दर्जात बोलणे, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही असे बोलणे ही कामराची कार्यपद्धती आहे. वादग्रस्त बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा त्याचा हव्यास आहे.
- उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्याने प्रयत्न केला. मतभेद असू शकतात. पण, जनतेत आदरभाव असलेल्या नेत्याविषयी इतक्या खालच्या दर्जात कामरा बोलतो. लगेचच विरोधक त्याच्या समर्थनात बोलायला उभे राहतात. हे कामराशी ठरवून चालले आहे की कामराला सुपारी दिली आहे? असा सवालही त्यांनी केला.
- हा कामरा ते राहुल गांधी लाल संविधान घेऊन फिरतात ते घेऊन फोटो ट्विट करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे; पण, त्याची मर्यादाही आहे. तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विधान परिषदेत विरोधकांचा स्थगन प्रस्ताव अन्...
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या कथित आक्षेपार्ह गाण्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेतही उमटले. कामराला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. सभागृहातील गोंधळाच्या वातावरणामुळे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कामकाज तीन वेळा तहकूब केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामराच्या विडंबन काव्यामुळे संबंधित स्टुडिओ पोलिसांसमक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. त्यावर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. मंत्री उदय सामंत म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलावे, हे संविधानाला अपेक्षित नाही. ही संस्कृती नाही, तर विकृती आहे. विरोधकांनी अशा प्रवृत्तीचे समर्थन करू नये. गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, कामरावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यामागील सूत्रधाराला शोधून काढण्यात येईल.