फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 08:55 IST2025-08-23T08:55:26+5:302025-08-23T08:55:59+5:30

उपराष्ट्रपती निवडणुकीची ठरली रणनीती

Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar discussions for hours on coordination between the three parties over vice president election | फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा

फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी रात्री दीडतासाहून अधिक वेळ चर्चा केली. महायुतीतील समन्वय कसा वाढवायचा यावर चर्चा करतानाच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मते कशी देता येतील यावर तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनाबाबत चर्चा झाली.

गेले काही दिवस महायुतीत समन्वयचा अभाव असल्याचे जाणवत आहे. मंत्री, आमदारांची वक्तव्ये, मंत्र्यांवर झालेले घोटाळ्यांचे आरोप या पार्श्वभूमीवर पुढील काळात हे प्रकार टाळून महायुती भक्कमपणे समोर नेण्याची भूमिका तिन्ही नेत्यांनी निश्चित केली. समन्वयाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेत्यांना लवकरच दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. शक्य तिथे महायुती करण्याचा प्रयत्न करावा अशी भूमिका घेण्यात आली. महायुती होणार नसेल आणि त्याचा फायदा हा विरोधी पक्षांना होणार असेल तर अशा ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा पुरेपूर प्रयत्न तिन्ही पक्षांकडून केला जाणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने तीन पक्षांमध्ये समन्वय कसा वाढवायचा यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्ती अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. या नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी कराव्यात असा आग्रह एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही आजच्या बैठकीत धरल्याचे समजते. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कसे हाताळायचे यावरही चर्चा झाली.

राधाकृष्णन यांना पाठिंबा अशक्य : पवार

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. मात्र ते शक्य नाही, ते आमच्या विचारांचे नाहीत, असे आपण फडणवीसांना सांगितले, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल असताना तिथले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात राज्यपालांसमोर अटक करण्यात आली होती. असे उदाहरण कधी यापूर्वी घडले नाही. सत्तेचा वापर कसा केला जातो याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. अशा व्यक्तीसाठी मतांची अपेक्षा करणे मला योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार आहेत; राज्यपाल आहेत. त्यांना समर्थन द्यावे असा फोन मी उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांनाही केला होता. त्यावर सगळ्यांशी चर्चा करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार दिला आहे, आम्हाला त्यांच्यासोबत जावे लागेल असे पवार यांनी सांगितले, पण कर्तव्य म्हणून आणि राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने मी दोघांना फोन केला होता.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar discussions for hours on coordination between the three parties over vice president election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.