'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' किरीट सोमय्या प्रकरणावरुन फडणवीस संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:12 PM2022-01-25T20:12:33+5:302022-01-25T20:12:39+5:30

'किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!'

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi Government over Kirit Somaiya notice | 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' किरीट सोमय्या प्रकरणावरुन फडणवीस संतापले

'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' किरीट सोमय्या प्रकरणावरुन फडणवीस संतापले

Next

मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या एका फोटोनं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. त्याचाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यानंतर नगरविकास खात्याकडून सोमय्या यांना एक नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीये.

फडणवीस यांनी ट्विटरुन सरकारवर टीका केली आहे. 'महा विकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा संतप्त सवाल फडणवीसांनी केला आहे. 'माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!' अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते 
दुसऱ्या एका ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात, 'मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार?' असा सवाल उपस्थित केला आहे.

हुकूमशाही कसली करता ?
'शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?' असंही फडणवीस म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi Government over Kirit Somaiya notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.