“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 20:35 IST2025-11-23T20:33:47+5:302025-11-23T20:35:31+5:30
Deputy CM Eknath Shinde News: घरात बसून तोंड पाटीलकी करणाऱ्यांना धडा शिकवा, विकासाला मतदान करा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
Deputy CM Eknath Shinde News: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
अक्कलकोट येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, घरात बसून फुकटची पाटीलकी करत नाही. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी थेट रस्त्यावर उतरतो. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की, आळशी माणसाचे तोंड पाहू नका, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी शिवसेना आहे. सरकार पडणार... सरकार पडणार... अशी जुनी रेकॉर्ड लावून विरोधक थकले, पण महायुती सरकार ठाम उभे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवली जाते
मोहोळमध्ये झालेल्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मोहोळमध्ये सुरू असलेली गुंडशाही मोडायची असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे या सुशिक्षित, सक्षम आणि कणखर नेतृत्वाला पाठिंबा मिळाल्याची स्पष्ट चिन्हे सभेनंतर दिसून आली. लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवली जाते. पण ही योजना चालू राहील हा मी शब्द देतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मोहोळसाठी मंजूर ३ हजार कोटींच्या विकास आराखड्याचा उल्लेख करत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा आणि शहर सुशोभीकरणासाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली.
दरम्यान, मी आज उपमुख्यमंत्री आहे, पण आधी कार्यकर्ता होतो आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. आता प्रत्येक शिवसैनिकाने एकनाथ शिंदे बनून घराघरात जाऊन विकास पोहोचवा. सत्ता येते-जाते, पण नाव आणि काम कायम राहते. म्हणूनच लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे झालेल्या सभेत सांगितले.