“जो हिंदुत्व विसरला, तो अस्तित्व विसरला!”; DCM एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:23 IST2025-11-10T15:20:17+5:302025-11-10T15:23:13+5:30
Deputy CM Eknath Shinde News: ‘लाडकी बहीण’ या योजनेवर बोलताना शिंदे म्हणाले की, ही योजना कोणाच्याही अफवांमुळे बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो.

“जो हिंदुत्व विसरला, तो अस्तित्व विसरला!”; DCM एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Deputy CM Eknath Shinde News: हिंदुत्वाचे दोन सशक्त प्रवाह शिवसेना आणि पतित पावन संघटना एकत्र आले आणि या भगव्या एकतेचा क्षण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता तीक्ष्ण वार केला. जो हिंदुत्व विसरला, तो स्वतः विसरला; जो स्वतः विसरला, तो देश विसरला; जो देश विसरला, तो अस्तित्व विसरला; आणि जो अस्तित्व विसरला, तो मेला, असे वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी हिंदुत्व सोडून सत्तेसाठी तडजोड करणाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढवला.
शिवसेना आणि पतित पावन संघटना या भगव्या रंगाच्या दोन प्रवाहांचा संगम झाला आहे. हा दिवस हिंदुत्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, गर्व से कहो हम हिंदू हैं, हा नारा देताना जेव्हा अनेक घाबरले, तेव्हा बाळासाहेबांनी निर्भीडपणे हिंदुत्वाचा झेंडा उंचावला. पतित पावन संघटनेने हिंदू संस्कृती आणि सावरकरांचा विचार जिवंत ठेवला आहे, तर शिवसेना बाळासाहेबांनी मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी उभी केली. हे दोन प्रवाह एकत्र आले म्हणजे भगवा रंग आणखी गडद झाला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत सांगितले की, हिंदुत्व विसरून जे लोक सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करतात, पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांसोबत बसतात, ते हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. हेच दुर्दैव आहे. आमचे हिंदुत्व खुर्चीसाठी नाही. सत्ता-खुर्ची ही मोह-माया आहे, पण विचारधारा चिरंतन आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन करत शिंदे म्हणाले की, आम्ही धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीतील कार्यकर्ते आहोत. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हा आमचा मंत्र आहे. हिंदुत्व म्हणजे एक जीवनपद्धती आहे; ती राजकीय विचारधारा नाही, तर सांस्कृतिक ओळख आहे.
दरम्यान, ‘लाडकी बहीण’ या योजनेवर बोलताना शिंदे म्हणाले की, ही योजना कोणाच्याही अफवांमुळे बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो, कारण आम्ही ‘प्रिंटिंग मिस्टेकवाले’ नाही. गाईला गोमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पंढरपूर वारीतील वारकऱ्यांना अनुदान, विमा, आरोग्य सुविधा दिल्या. गणेशोत्सव, नवरात्र, गोविंदा हे सण पुन्हा जोमाने सुरू केले. हीच खरी हिंदुत्व सेवा आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.