“संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:52 IST2025-02-12T17:50:00+5:302025-02-12T17:52:33+5:30
Deputy CM Eknath Shinde: विधानसभेत पानिपत होऊनही हे सुधारत नाहीत. असेच सुरू राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चितपट होतील, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde: सरहदच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राजकारणाला योग्य दिशा देण्याचेही काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्यावर टीका केली. याला आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना संजय राऊतांवर पलटवार केला.
ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे, ही आमची भावना आहे. कदाचित शरद पवार यांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे पटले नाही. पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित केले, यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. पवारसाहेब, आम्हाला तुमचे दिल्लील राजकारण जे काही आहे ते आम्हाला माहिती नाही, आम्हालाही राजकारण कळते. पण आम्हाला सर्वांना आणि महाराष्ट्राला या गोष्टीमुळे नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, असे सांगत संजय राऊतांनी बोचरी टीका केली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.
संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला
अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. महादजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते. अटकपासून कटकपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा भगवा ध्वज डौलाने फडकवला. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला हे माझे भाग्य आहे. परंतु, यामुळे सर्व विरोधकांना पोटदुखी झाली आहे. मात्र द्वेषाने पछाडलेले विरोधक टीका करताना काय बोलतात हेही त्यांना कळत नाही. त्यांनी महादजी शिंदे यांचा अपमान केला आहे. महापराक्रमी योद्धाचा अपमान केला आहे. तर साहित्यिकांनाही दलाल म्हटले आहे. त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही अपमान केला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही नाती जपायची असतात. संबंध जोडायचे असतात. हे शरद पवार यांनी दाखवून दिले. मी माझ्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या, १० वर्षे मंत्रीपदाच्या आणि ४० वर्षे सामाजिक कारकिर्दीत कधीही राजकारणाच्या कक्षेत बांधून घेतले नाही. राजकारण्याच्या पलीकडे मैत्रीही जपली. संबंधही जपले. म्हणूनच या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, जे आता आरोप करत आहेत, दोष देत आहेत, जे लोकांचा अपमान करत आहेत, या सर्वांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल. विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चीत केले. महादजी शिंदे यांनी पानिपतला लढाई केली, तसे महाराष्ट्रात लाडक्या बहिणी, शेतकरी सगळ्यांनी विरोधकांचे पानिपत केले. त्यांना विरोधी पक्षनेता निवडता येईल, एवढी संख्याही दिली नाही. तरीही सुधारणा होत नाही आणि असेच ते बोलत राहिले, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता या लोकांना धडा शिकवेल आणि चारी मुंड्या चीत होतील, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी चांगलेच सुनावले.