पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:21 IST2025-09-23T18:21:09+5:302025-09-23T18:21:09+5:30

Deputy CM Eknath Shinde News: दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

deputy cm eknath shinde reaction on rains lashed in the state and farmers are in trouble when will the government decide on loan waiver | पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...

पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: राज्यातील अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही वाहून गेली आहे. या मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. शेतीच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे केले जात आहेत. अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांनाही मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्यांचे पंचनामे युद्धपातळीवर केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मीही धाराशिवला जाणार, इतर मंत्रीही पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. पावसामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभाग सतर्क आहे. जीवनावश्यक वस्तू विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत, यात पीठ, कपडे, भांडी, औषधे, साड्या यांचा समावेश आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?

सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर आहे, याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, दोन्ही सरकारांकडून मदत केली जाईल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. युद्धपातळीवर मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दरम्यान, राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. ओला दुष्काळ काय, याठिकाणी जे काही नुकसान झाले आहे; त्याकरिता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे, ती सगळी मदत आम्ही देऊ. खरडून गेलेल्या जमिनीकरिता आपला शासन निर्णय आहे. तातडीची मदतही आपण करतो आहोत. मागच्या काळात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी एकत्रित पंचनामे आल्यावर मदत करण्याऐवजी जसे पंचनामे येतील, तशी मदत करत आहोत. त्यामुळे आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत करण्याचे शासन निर्णय काढले आहेत. यातील १८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झाले आहेत. पुढच्या आठ-दहा दिवसात पैसे जमा होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: deputy cm eknath shinde reaction on rains lashed in the state and farmers are in trouble when will the government decide on loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.