Deepali Chavan Suicide Case: रेड्डीला सहआरोपी करा, काळी बाजू समोर येईल - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 17:31 IST2021-03-31T17:28:17+5:302021-03-31T17:31:12+5:30
Deepali Chavan Suicide Case: याप्रकरणी रेड्डी यांचे निलंबन करून थांबू नका, त्याला सहआरोपी केल्यास या प्रकणातील काळी बाजू समोर येईल. त्यामुळे या प्रकरणात रेड्डीला सहआरोपी करण्याची मागणी वंचितने केली आहे.

Deepali Chavan Suicide Case: रेड्डीला सहआरोपी करा, काळी बाजू समोर येईल - प्रकाश आंबेडकर
अमरावती : हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा तपास हा वरवर केला जात आहे. त्यांनी ज्यांच्या संदर्भात चौकशी मागितली होती, अशी प्रकरणे बाहेर काढा, त्याचे धागेदारे थेट मेळघाटातील वाघ का कमी होतात? सागाची तस्करी का सुरू आहे? इथ पर्यंत पोहचतील, असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. (Deepali Chavan Suicide Case: Make Reddy a co-accused, the dark side will come forward - Prakash Ambedkar)
दीपाली चव्हाण यांच्यावर दोन वेळा ॲट्रासिटीचे गुन्हे दाखल झाले, त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला. या गुन्ह्यातील फिर्यादी कोण आहेत. त्यांची आर्थिक स्थिती काय? याचा तपास करून सत्य राज्य सरकारने जनतेसमोर आणावे. राज्य सरकारने आठ दिवसांत या दृष्टीने माहिती समोर न आणल्यास वंचितच्या नेत्या प्रा. निशा शेडे या प्रकरणातील सत्य बाहेर आणतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तसेच, याप्रकरणी रेड्डी यांचे निलंबन करून थांबू नका, त्याला सहआरोपी केल्यास या प्रकणातील काळी बाजू समोर येईल. त्यामुळे या प्रकरणात रेड्डीला सहआरोपी करण्याची मागणी वंचितने केली आहे.
(‘दिपाली चव्हाण यांना न्याय द्या...’ वनखात्यात संतापाची लाट; महानिरिक्षकांना दिले निवेदन)
याचबरोबर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. वाझे व परमवीर प्रकरणात १०० कोटीमध्ये कोणाचा हिस्सा होता. महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाला किती वाटा दिला जात होता हे समोर आणा. शरद पवारांच्या भेटीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे साऱ्याच गोष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत, असे म्हणतात. त्यामुळे या १०० कोटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जर वाटा नसेल तर भाजपाने त्या भेटीमधील सत्य बाहेर सांगितले पाहिजे, असेही म्हटले आहे.
याशिवाय, फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल सार्वजनिक करावा. मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी असे करणे आवश्यक आहे. अन्यथा या प्रकणात मुख्यमंत्री कार्यालयाचाही सहभाग असावा अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.