"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:21 IST2025-07-16T14:04:27+5:302025-07-16T14:21:40+5:30
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
Chandrashekhar Bawankule on Praveem Gaikwad Attack: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापुरात झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अक्कलकोटमध्ये १३ जुलै रोजी शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर शाईफेक केली होती. त्यानंतर दीपक काटे चर्चेत आला होता. दीपक काटे याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचे फोटो अन् व्हीडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर काटेंचा भाजपशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात आलं होतं. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं असल्याचे म्हटलं.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवर्धम प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करत शाईफेक करण्यात आली होती. या संघटनेचा प्रमुख दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं. त्यानंतर आता दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचे होते आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
"प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध मी पहिल्यांदा केला. मी अशा घटनांचा निषेध करतो. प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो मान्य नाही. तो निषेधार्य आहे. दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला मी जेव्हा गेलो त्यावेळी मी म्हटलं होतं की हा चांगले काम करेल, याच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत. पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलत असतो. पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा आपण त्याच्या पाठीशी उभे राहतो. पण दीपक काटेने प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर हल्ला करणे चुकीचे आहे. विचारांची लढाई लढता येऊ शकते पण आपले संस्कार, संस्कृती कधीही अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाहीत," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
"प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे भाजप समर्थन करत नाही. दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. या राज्यात विचारांनी लढाई लढू शकता. पण कोणावर हल्ला करून लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका. दीपक काटे यांनी केलेले कृत्य चुकीचं आहे. त्याला समर्थन नाही. अडीच वर्षांपूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो, दीपक काटे मला दोन ते तीन वेळेस भेटले होते, दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचे समर्थन नाही," असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.