'रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या', भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:27 IST2025-12-10T13:23:20+5:302025-12-10T13:27:12+5:30
Bhagwat Karad News: छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा, अशी प्रभावी आणि ठोस मागणी राज्यसभेत खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज मांडली. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, नवीन मार्गांची अत्यावश्यक गरज तसेच औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

'रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या', भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी
छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा, अशी प्रभावी आणि ठोस मागणी राज्यसभेत खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज मांडली. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, नवीन मार्गांची अत्यावश्यक गरज तसेच औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. कराड म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राचे पर्यटन राजधानी मानले जाते. अजिंठा-वेरूळ लेणी, कैलास मंदिर, देवगिरी किल्ला, पानचक्की, बीबी का मकबरा या जागतिक ख्यातीच्या स्थळांमुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. तसेच दिल्ली–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन परिसरात जवळपास एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू असून, या पार्श्वभूमीवर प्रगत रेल्वे सुविधांची गरज अधिक भासते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन वंदे भारतची मागणी
सध्याची वंदे भारत एक्सप्रेस (छत्रपती संभाजीनगर–नांदेड) विस्तारून सुरू असल्याने, छत्रपती संभाजीनगर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणीही खासदार डॉ. भागवत कराड यांनी सभागृहात केली. पीट लाईन आणि सिक लाईनची कामे छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण झाल्यामुळे ही सेवा सुरू करण्यास कोणताही अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन रेल्वेमार्गांना तातडीने मान्यता द्या
छत्रपती संभाजीनगरला उत्तर भारताशी जोडणाऱ्या संभाजीनगर–कन्नड–चाळीसगाव या प्रस्तावित मार्गाच्या सर्व्हेक्षणाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच संभाजीनगर–पैठण–बीड–सोलापूर या महत्त्वपूर्ण मार्गाला तातडीने मान्यता द्यावी, अशी त्यांनी मागणी केली.
याशिवाय संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे हा औद्योगिकदृष्ट्या तसेच उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण रेल्वेमार्ग असून, या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. वरील सर्व मागण्या स्वीकारून मराठवाड्यातील रेल्वे सुविधांचा विकास गतीमान करण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.