आंबेडकर भवनचा वाद धुमसतोय

By Admin | Updated: July 4, 2016 02:21 IST2016-07-04T02:21:34+5:302016-07-04T02:21:34+5:30

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

Debate of Ambedkar Bhawan | आंबेडकर भवनचा वाद धुमसतोय

आंबेडकर भवनचा वाद धुमसतोय


दादर येथील आंबेडकर भवनच्या पुनर्विकासावरून पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे. एकीकडे रिपब्लिकन गटातील काही नेते गायकवाड यांचे समर्थन करीत आहेत, तर दुसरीकडे काही नेते आंबेडकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या या वास्तूमुळे चळवळीतील कार्यकर्तेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे.
मुंबई : आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, ‘दलित पँथर’ आणि ‘सम्यक क्रांती’ या संघटनांचे प्रवर्तक ज. वि. पवार यांनी आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांच्यावर कठोर टीका केली आहे.
पवार याबाबत म्हणाले की, रत्नाकर गायकवाड यांचा सामाजिक अथवा राजकीय चळवळींशी काडीमात्र संबंध नाही. तसेच ट्रस्टशीही काही संबंध नाही. मी ट्रस्टचा सल्लागार असल्याचा दावा गायकवाड करत असले तरीही या ट्रस्टमध्ये सल्लागार नावाचे पदच अस्तित्वात नाही; हे मी आवर्जून सांगू इच्छितो. ज्या भवनात चळवळी उभ्या राहिल्या; त्यावर गायकवाड यांनी हातोडा चालवला आहे, हे योग्य नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे एक नाही, तर दोन भूखंड आहेत. परिणामी, एका भूखंडावरील प्रेस पाडण्याची गरजच नव्हती. प्रेसवरील अधिकार हा खासगी आहे; आणि तो प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे. ज्या वास्तूमध्ये ऐक्य उभे राहिले, ज्या वास्तूमध्ये चळवळी उभ्या राहिल्या, तीच वास्तू गायकवाड यांनी जमीनदोस्त केली आहे. या वास्तूने उत्तम साहित्यिक दिले आहेत. यात बाबूराव बागूल यांच्यापासून नामदेव ढसाळ यांचा समावेश आहे. शिवाय माझा पहिला लेखही याच प्रेसमधून प्रसिद्ध झाला होता. आता जे जुने ट्रस्टी आहेत; त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे.
>‘मुख्यमंत्री गप्प का?’
रत्नाकर गायकवाड हे सरकारी पदांचा गैरवापर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. ज्यांनी भवन पाडले त्यांना अटक होत नाही. रत्नाकर गायकवाड यांनी यापूर्वी मोठी पदे भूषवली आहेत. मग तेव्हा एखादे आंबेडकर भवन उभे करावे, असे त्यांना का वाटले नाही? भवनाच्या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५०० कोटी एवढी आहे. गायकवाड यांना या भूखंडावर ‘व्यावसायिक संकुल’ उभे करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.
>तर न्यायालयाचे दरवाजे खुले’
जरी या ठिकाणी दोन भूखंड असले तरी त्यावरील मालकी हक्क ट्रस्टचाच आहे. जे या भूखंडावर मालकी हक्क सांगत आहेत, त्यांना यापूर्वीच तशी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन ट्रस्टने केले होते. मात्र अशी कोणतीही कागदपत्रे समोर आली नाहीत. यापुढेही ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावहून या ठिकाणी हलवलेली प्रेस भाडेतत्त्वावर सुरू होती. १९३० साली खरेदी केलेली प्रेसची मशीन यापूर्वीच त्यांच्या वारसांकडून भंगारात विकण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा वारसा नष्ट करण्याचे होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावाही रत्नाकर गायकवाड यांनी केला.

Web Title: Debate of Ambedkar Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.