उष्माघाताने दोघा वृद्ध भिकार्यांचा मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2014 00:08 IST2014-06-07T22:32:45+5:302014-06-08T00:08:37+5:30
शनिवारी दुपारी दोघा वृद्ध भिकार्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

उष्माघाताने दोघा वृद्ध भिकार्यांचा मृत्यू
अकोला : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने नागरिकांना उष्माघाताचा फटका बसत आहे. शनिवारी दुपारी दोघा वृद्ध भिकार्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या दोघा मृत वृद्धांच्या नाकातून रक्त बाहेर आल्याचे दिसून आल्याने त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा.
शनिवारी दुपारी दामले चौकातील न्यू ईरा हायस्कूलसमोर अनोळखी वृद्ध भिकारी मृतावस्थेत आढळून आला. रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता, मृतक वृद्ध भिकार्यांच्या नाकातून रक्त बाहेर येत असल्याचे दिसून आले. या मृतक वृद्धाचे वय अंदाजे ६५ ते ७0 वर्ष आहे. त्याच्या डोक्यावरील केस पांढरे असून, डोक्याला टक्कल पडले आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दुसरी घटना देवी पोलिस लाईन परिसरात घडली. या ठिकाणी शनिवारी सकाळी एक अनोळखी वृद्ध भिकारी मृतावस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही. या वृद्ध भिकार्याच्या नाकातूनही रक्त येत असल्याने, त्याचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज कोतवाली पोलिसांनी व्यक्त केला. दोन्ही वृद्ध भिकार्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होईल.