death rate of corona patients high in maharashtra creates concern kkg | CoronaVirus: कोरोनाचा वाढता धोका; केंद्राच्या 'त्या' आकडेवारीनं वाढवली महाराष्ट्राची चिंता

CoronaVirus: कोरोनाचा वाढता धोका; केंद्राच्या 'त्या' आकडेवारीनं वाढवली महाराष्ट्राची चिंता

नवी दिल्ली: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजाराहून अधिक आहे. यातील हजारपेक्षा अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातल्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारच्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन निर्णय घेतला. मात्र रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्क्यांहून अधिक जण मुंबईतले आहेत. लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असल्यानं मुंबईत कोरोना वेगानं हातपाय पसरतो आहे. अशातच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीमुळे राज्याची चिंता आणखी वाढली आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार केल्यास सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरदेखील जास्त आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या ५.९८ टक्के रुग्णांनी जीव गमावला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा विचार केल्यास हाच दर २.६६ टक्के इतका आहे. जागतिक पातळीवर हीच टक्केवारी ५.५८ इतकी आहे. त्यामुळेच राज्याच्या दृष्टीनं ही आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. 

महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांचा विचार केल्यास कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. कर्नाटक (२.६४%), आंध्र प्रदेश (१.९२%), गोवा (०.०%), छत्तीसगड (०.०%), मध्य प्रदेश (५.४५%) अशी सध्याची आकडेवारी आहे. गुजरातमधील मृत्यूदर मात्र महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. गुजरातमध्ये कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी ८.३४ टक्के जणांनी जीव गमावला आहे. उत्तरेतील राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा बरी आहे. उत्तर प्रदेश (०.९८%), बिहार (३.१२%), दिल्ली (१.३३%) अशी सध्याची स्थिती आहे.

Web Title: death rate of corona patients high in maharashtra creates concern kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.