राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी स्क्रिप्टेड वाटतात का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 17:39 IST2023-05-05T17:39:01+5:302023-05-05T17:39:34+5:30
Devendra Fadnavis On NCP: देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील घडामोडींवर सूचक शब्दांत भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी स्क्रिप्टेड वाटतात का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले ठाकरे गट आणि काँग्रस यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही यावर भाष्य करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत या घडामोडींवर भाष्य केले.
शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवारांनी निवडलेल्या समितीची बैठक झाली. या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. त्याचे कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा शेवट होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी स्क्रिप्टेड वाटतात का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या सगळ्या घडामोडी या स्क्रिप्टेड वाटतायत का? असा प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर, असे मी म्हटले नाही, मी असे काही म्हणणार नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल, अंतिम काय होतेय. यावर प्रतिक्रिया देता येईल, असेही फडणवीस म्हणाले आहेत.