“प्रत्येकास बाजू मांडायचा अधिकार”; निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर अजित पवारांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:32 IST2023-09-15T13:31:55+5:302023-09-15T13:32:08+5:30
NCP Ajit Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय होणार, पक्ष नाव, पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.

“प्रत्येकास बाजू मांडायचा अधिकार”; निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर अजित पवारांची स्पष्ट भूमिका
NCP Ajit Pawar News: काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत पक्षात मोठी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थ खात्याचा कार्यभारही अजित पवारांकडे देण्यात आला. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ०६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह दोन्हीपैकी कोणत्या गटाला मिळणार आणि पक्ष नेमका कोणाचा? यासाठी निवडणूक आयोगसमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष नाव आणि चिन्ह याबाबत दावा करताना, ते अजित पवार गटाकडे राहील, असे म्हटले होते. तर, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेप्रमाणे निकाल आल्यास आमच्याकडून पक्ष नाव आणि चिन्ह जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती. यात आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
प्रत्येकास बाजू मांडायचा अधिकार
प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, आम्हीही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर ठेवू, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. राष्ट्रवादी खरी कुठली? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, ते सांगतील ना, प्रत्येकजण आपाआपली भूमिका मांडणार. त्यासंदर्भात ज्यांना बोलवले आहे ते आपली बाजू कशी उजवी आहे, याबद्दल निवडणूक आयोगाला पटवून देतील आणि इलेक्शन कमिशनला तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ते दोघांचे ऐकून घेतील आणि निर्णय घेतील आणि त्यांनी दिलेला निर्णय दोघांना मान्य करावा लागेल, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेमध्ये झालेल्या लढ्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिन्ह आणि पक्षावरुन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे पदाधिकारी हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे उत्तरामध्ये म्हटले आहे.