LMOTY 2022: डॅशिंग पोलीस अधिकारी अंकित गोयल ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 21:48 IST2022-10-11T20:43:55+5:302022-10-11T21:48:29+5:30
प्रोमिसिंग आय पी एस अधिकारी म्हणून अंकित गोयल यांचा गौरव

LMOTY 2022: डॅशिंग पोलीस अधिकारी अंकित गोयल ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराचे मानकरी
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. प्रशासन आय पी एस (प्रोमिसिंग) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदाच्या म्हणजेच २०२२ च्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या प्रोमिसिंग आय पी एस अधिकारी म्हणून अंकित गोयल (Ankit Goyal) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
LIVE: गडचिरोलीचे जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोएल यांना IPS (प्रॉमिसिंग) श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मानित #LokmatMaharashtrianOfTheYear#LMOTY2022
— Lokmat (@lokmat) October 11, 2022
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
नक्षलवाद्यांच्या चकमकींमध्ये २७ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडेसह ५४ नक्षलवादी मारले गेले. दोन वर्षात ४४ जणांना अटक करण्यात यश आले. १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळेच गडचिरोलीत सेवा देणाऱ्या ४२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, ३ जणांना शौर्यचक्र तर २ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर करण्यात आले. एवढ्या संख्येने एका जिल्ह्यात एकावेळी शौर्य पदक जाहीर होणारा गडचिरोली हा पहिलाच जिल्हा ठरला. या कामगिरीत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे.
२८ सप्टेंबर २०२० रोजी अंकित गोयल यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतला. वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम सुरू केला. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेऊन भारतीय पोलीस सेवेत १३ फेब्रुवारी २०१२ रोजी रुजू झालेले तरुण पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे अवघ्या आठ वर्षांच्या सेवेनंतर गडचिरोलीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची धुरा आली.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, १६ आत्मसमर्पितांचा सामूहिक विवाह, दुर्गम भागातील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ''पोलीस दादालोरा खिडकी'', अर्थात ‘पोलीस दादाची खिडकी’ उपक्रम, २१ हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ, दोन हजार युवांना विविध क्षेत्रात रोजगार, असे अनेक उपक्रम त्यांनी केले.