पर्यटनात दापोली हायटेक होणार!
By Admin | Updated: January 20, 2015 23:42 IST2015-01-20T21:39:23+5:302015-01-20T23:42:44+5:30
पंचावन्न पर्यटनस्थळे : पर्यटन प्रबोधनाच्या पातळीवर अधिक प्रयत्नांची गरज

पर्यटनात दापोली हायटेक होणार!
सुनील कदम- आंजर्ले -दापोली तालुक्याला लाभलेले निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे यांच्या बरोबरच समृध्द वन्य जीवनही लाभले आहे. हे वन्यजीव जपणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यांची माहिती राज्यभरात पोहोचणे गरजेचे आहे. तसे झाल्यास राज्यभरातून वन्यजीवप्रेमी दापोलीत येतील व त्यातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. दापोली तालुका आता पर्यटनदृष्ट्या राज्यात हायलाईट झाला आहे. दापोलीला लाभलेले निसर्गसौंदर्य व असलेली ५० ते ५५ पर्यटनस्थळे यामुळे राज्यभरातून पर्यटक दापोलीत येऊ लागले आहेत. यांपैकी बहुसंख्य पर्यटकांना फक्त पर्यटनस्थळेच माहीत असतात. मात्र, दापोलीतील वन्य जीवनही अत्यंत समृध्द आहे, हे फारच कमी पर्यटकांपर्यंत पोहोचले आहे. दापोलीत आढळणारे विविध प्राणी, पक्षी, साप यांची माहिती पर्यटकांना दिली गेल्यास त्यांच्यासाठी एक नवे दालन खुले होईल. राज्यभरातून वन्यजीव प्रेमी दापोलीत येतील व पर्यटन व्यवसाय वाढीसाठी चालना मिळेल. दापोलीत आढळणाऱ्या वन्य प्राण्यांची माहिती पर्यटकांना देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दापोलीत आढळणाऱ्या प्राण्यांंची नावे, त्यांच्या अधिवासाची एक सूची तयार करणे गरजेचे आहे. वन विभाग व वनशास्त्र महाविद्यालय, दापोली यांनी पुढाकार घेऊन, ही सूची तयार करणे व याबाबतची माहिती देणारा एक फलक शहरात लावणे गरजेचे आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना दापोलीत आढळणाऱ्या वन्यजीवांची माहिती मिळेल. त्याच बरोबर पर्यटकांना वन्यजीव दाखवणारी जंगलसफारी सुरू करणे गरजेचे आहे. वन विभाग आणि वनशास्त्र महाविद्यालयाने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे.
दापोलीत आढळणारे प्राणी-- पक्षी
दापोलीत सध्या १० ते १५ बिबट्यांचा संचार आहे. दापोलीच्या जंगलांमध्ये नेमके किती बिबटे आहेत, याचा अचूक आकडा वनविभागाकडे नाही. मात्र, १० ते १५ बिबट्यांचा संचार आहे.
दापोलीच्या जंगलांमध्ये दुर्मीळ चौसिंगा आढळून आला आहे. दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयाने चौसिंगाचा वावर शोधून काढला. हरण प्रजातीतील हा प्राणी खास आकर्षण आहे.
गिधाडांच्या प्रजाती वाचवण्यासाठी जगात युध्दपातळीवर मोहीम राबवली जात आहे. दापोलीत आंजर्ले गावात भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग मित्रने नैसर्गिकरित्या गिधाडे संवर्धनाचा उपक्रम राबवला आहे.
हा परदेशी पक्षी दापोलीत सप्टेंबर नंतर दाखल होतो. पावसाला सुरूवात झाल्यावर पुन्हा निघून जातो. मुरूड, पाळंदे, हर्णै, आडे या समुद्र किनाऱ्यांवर सप्टेंबरनंतर हे सीगल पक्षी आढळतात.
समुद्र गरूड हा दुर्मीळ पक्षी दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांवर आढळतो. मुरूड, कोळथरे, पाळंदे, आंजर्ले, केळशी येथील समुद्र किनाऱ्यावर आढळतो.
हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी. हा पक्षी दापोलीत मोठ्या प्रमाणावर आढळतो. अगदी दापोली शहरातही याचे दर्शन घडते. धनेश पक्षी पहायला मिळणे पवर्णीच.
हरण प्रजातीतील भेकर हा प्राणी आहे. ही भेकरे दापोलीतील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या भेकरांच्या संरक्षणासाठी वन्यजीव रक्षकांनी पुढे यावे.
दापोलीत मोठ्या प्रमाणावर नीलगार्इंचा वावर आहे. दाभोळ रस्त्यावर अनेकांना नीलगाई दिसल्या आहेत. यांचा अचूक आकडा वन विभागाकडे नाही.
दापोलीत नाग, मण्यार, घोणस, फुरसे, हरणटोळ, मांडोळ, धामण, अजगर आदी साप आढळतात. बांधतिवरे येथील संरक्षित जंगलात यांचा वावर मोठा आहे. या जंगलात विविध प्रकारचे साप पाहता येतात.
दापोलीत लाडघर ते केळशी या समुद्रात डॉल्फीन मासे दिसतात. डॉल्फीन मासे पाहण्यासाठी मुरूड, कर्दे, लाडघर, पाळंदे येथे डॉल्फीन सफारी सुरू झाली आहे.
सागरी कासवे : दापोलीच्या कोळथरे, लाडघर, पाळंदे, आंजर्ले, केळशी या किना-यांवर आॅलिव्ह रिडले जातीची सागरी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. या किना-यांवर सागरी कासवे पाहता येतात. सागरी कासवे दापोली च्या कोळथरे, लाडघर, पाळंदे, आंजर्ले या ठिकाणीच आढळतात. ही कासवे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
जंगलग्रस्त भागात फिरणाऱ्या प्राण्यांच्या रक्षणाबरोबरच वनांचेही रक्षण व्हायला हवे.
अन्य आढळणारे पक्षी : सर्पगरुड, बुलबुल, पोपट, चिमण््या, पाणकोंबड्या, भारव्दाज, धोबी, शिंपी, खंड्या, रानकोंबडे, कोतवाल, बगळे आदी पक्षी आढळतात. तसेच विविध जातीची फुलपाखरे ही मोठ्या प्रमाणावर आढळतात.