पिंपळे गुरव : नवी सांगवी व पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण व जागृती समितीच्या वतीने डेंगीविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यकर्त्यांनी पदयात्रेद्वारे शाळा, राजमाता जिजाऊ उद्यान, बसथांबे या ठिकाणी आला पावसाळा आरोग्य सांभाळा, या घोषवाक्यातून डेंगीविषयी जनजागृती केली. डेंगीबाबत घ्यावयाची काळजी याची माहितीपत्रके विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाटप करण्यात आली. या वेळी कोपरासभेत समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले. त्याबरोबर पाण्याच्या टाक्यांना झाकण, कुलर, फ्रिजच्या साफसफाईबरोबर अंगण व गच्चीतील भंगार वस्तूंची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जनजागृती केली. शहर समिती अध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास कुचेकर, संजना कपूर, विकास शहाणे, शोभा कांबळे, वसंतराव चकटे, किसन फसके, संजीव भालेराव आदींनी संयोजन केले. डेंगीबाबत जनजागृती मोहीमेत सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. सांगवी येथील युथ व्हिजन या संस्थेमार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून लोकांमध्ये जागृती घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.(वार्ताहर)>गेल्या आठवड्यात सर्दी, ताप आणि खोकल्याची साथ शहर परिसरात पसरली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यातील आजार आणि डेंगीपासून बचावाचे उपाय या संदर्भात जनजागृती केली जात आहे. विविध सामाजिक संस्थांचा या मोहीमेमध्ये सहभाग असल्याचे दिसत आहे.
डेंगीबाबत जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:26 IST