लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवलीतील सावली बारवर समतानगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २२ बारबाला, २२ ग्राहक, ४ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. त्या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे असून, त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत, असा आरोप उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केला.
गृहराज्यमंत्र्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असून, नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आ. अनिल परब यांनी डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे, असा सवाल केला.
गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन याला सरकारचा पाठिंबा नाही हे सरकारने दाखवून द्यावे. अजित पवार यांचे दिवंगत माजी सहकारी आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा कायदा आणला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पुरावे आ. परब यांनी द्यावे. ते तपासून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले.