Sanjay Raut: शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, बाळासाहेब असते तर...; खासदार नवनीत राणा संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 16:03 IST2022-04-07T16:02:33+5:302022-04-07T16:03:18+5:30
मुंबई विमानतळाबाहेर संजय राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे

Sanjay Raut: शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, बाळासाहेब असते तर...; खासदार नवनीत राणा संतापल्या
मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई सुरू होती. त्यात संजय राऊतांच्या मालमत्तेवरही ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबाग येथील काही जमिनींचा समावेश आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचं शरद पवारांनी सांगितले. त्यात आज संजय राऊत दिल्लीतून मुंबईत येत आहेत. त्यामुळे विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
राऊतांच्या स्वागतासाठी केलेल्या गर्दीवरून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर नाही. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील लोकांच्या पैशाचा गैरवापर केला. ते तपासात अडकले आहेत. त्यांचे स्वागत शिवसैनिक करत आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर महाराष्ट्रात असे घडले नसते. बाळासाहेबांनी भ्रष्टाचारी लोकांना उभं पण केले नसते. राऊतांवरील आरोप सिद्ध होत असल्याने संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी विचार करून या गोष्टी केल्या पाहिजेत अशा शब्दात नवनीत राणांनी भाष्य केले आहे.
शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय
मुंबई विमानतळाबाहेर संजय राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. त्यामध्ये शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय. गेली २ वर्ष हा योद्धा पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी भाजपाशी लढत आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सूडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आम्ही सगळे शिवसैनिक योद्धाला सलाम करण्यासाठी आलो आहोत. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितले आहे.
भाजपाला जाब विचारावाच लागेल- संजय राऊत
भ्रष्टाचार करणारे सोमय्या पिता-पूत्र जेलमध्ये जाणारच आहेत. देशद्रोही सोमय्यांची देवेंद्र फडणवीस वकिली केली. राजभवनाने पुरावे देऊन फडणवीसांनी सोमय्यांची बाजू घेतल्याचं मला आश्चर्य वाटतं. आयएनएस विक्रांतचा सोमय्यांनी लिलाव मांडला. भ्रष्टाचारविरोधात महाराष्टभर आंदोलन उभारणार आहे. गद्दाराला महाराष्ट्राच्या मातीत गाढल्याशिवाय राहणार नाही. आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे सोमय्यांनी निवडणुकीत वापरले. पैसे जमा करण्यासाठी ७०० बॉक्स वापरले, सगळे पैसे मुलूंडमधील कार्यालयात ठेवले. या घोटाळ्यासाठी किरीट सोमय्यांनी पीएमसी बँकेत वापर केला. देवेंद्र फडणवीसांनी या भ्रष्टाचारी सोमय्यांना जोडे मारले पाहिजेत. फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, रज्जू भैय्या, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल. भाजपाला जाब विचारावाच लागेल अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपाला फटकारलं आहे.