शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांकडून पैसे घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:24 IST2026-03-17T10:23:27+5:302026-03-17T10:24:14+5:30
उद्धवसेनेचे सुनील प्रभू आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. आबिटकर यांनी सांगितले की, या योजनांच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांशी करार केला जातो, त्यातच अतिरिक्त पैसे न घेण्याची मुख्य अट असते.

शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांकडून पैसे घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार
मुंबई : महात्मा ज्योतीराव फुले व पंतप्रधान जनआरोग्य योजनांचा लाभ मिळत असलेल्या रुग्णांकडून जी रुग्णालये पैसे घेतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. अशा पाच रुग्णालयांविरुद्ध अशी कारवाई करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
उद्धवसेनेचे सुनील प्रभू आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. आबिटकर यांनी सांगितले की, या योजनांच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांशी करार केला जातो, त्यातच अतिरिक्त पैसे न घेण्याची मुख्य अट असते. तरीही पैसे घेतले जातात, असे प्रकार घडले आहेत. अशा ३३८ प्रकरणी ६० लाख ४७ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अन्य २६६ प्रकरणी चौकशी सुरू आहे. अकोला जिल्ह्यात १२ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. एका रुग्णास पैसे परत करण्यात आले असून उर्वरित ११ रुग्णालयांना नोटीसा बजावल्या आहेत.
त्वरित कारवाई करणार -
मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, विविध प्रकारची कारवाई करूनदेखील असे प्रकार घडत असल्याने काही रुग्णालयांच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान पाच रुग्णालयांवर अशी कारवाई केली जाईल.
रुग्णालयाशी दोन्ही योजनांबाबत जो करार केलेला आहे त्यातील तरतुदींचे कोणत्याही स्वरूपातील उल्लंघन हे खपवून घेतले जाणार नाही. तक्रार येईल त्याच दिवशी कारवाई केली जाईल. ज्येष्ठ सदस्य काँग्रेसचे नाना पटोले, भाजपचे बबनराव लोणीकर, रणधीर सावरकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.