राम कदमांवर गुन्हा

By Admin | Updated: October 8, 2014 04:00 IST2014-10-08T04:00:58+5:302014-10-08T04:00:58+5:30

मनसेतून भाजपामध्ये गेलेल्या आमदार राम कदम यांच्यावर निवडणुकीसंदर्भात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Crime on Ram Kadam | राम कदमांवर गुन्हा

राम कदमांवर गुन्हा

मुंबई : मनसेतून भाजपामध्ये गेलेल्या आमदार राम कदम यांच्यावर निवडणुकीसंदर्भात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कार्यालयाच्या नावावर घेतलेल्या परवानगीवर कदम यांनी मंदिरात मंडप उभारून धार्मिक प्रचार सुरू केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने घाटकोपर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दिलेल्या आदेशानुसार घाटकोपर पोलिसांनी कदम, त्यांचे सचिव आणि मंदिराचे विश्वस्त यांच्याविरोधात फसवणुकीसह धार्मिक प्रचार केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.
गुन्हा नोंद झाल्यानंतर तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. दरम्यान, मंदिर विश्वस्ताने मंडप घालण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते, तर सचिवाने या प्रकारात मध्यस्थी केली होती, अशी माहिती मिळते.
घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील असल्फा गाव, भाजी मार्केटजवळील गणेश मंदिरासमोत कापडी मंडप घालून धार्मिक प्रचार सुरू केला, अशी तक्रार काल निवडणूक कार्यालयात आली. त्यानुसार मतदारसंघातील उमेदवार आणि राजकीय हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या भरारी पथकाने संबंधित मंदिर गाठले.
तेथील भाजपा कार्यकर्त्यांना परवानगीबाबत विचारणा केली. कार्यकर्त्यांनी जी परवानगी पुढे केली ती बंद असलेले प्रचार कार्यालय पुन्हा उघडण्यासाठीची होती. मात्र मंडप उभारणीचा उल्लेख त्यात नव्हता. हा आचारसंहिता भंग आणि फसवणुकीचा गुन्हा असल्याचे लक्षात येताच भरारी पथकाने तत्काळ घाटकोपर पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime on Ram Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.