CoronaVirus Worrying: Corona is spreading rapidly in Maharashtra including Mumbai | CoronaVirus चिंताजनक : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वेगाने होतोय फैलाव

CoronaVirus चिंताजनक : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वेगाने होतोय फैलाव


मुंबई/नवी दिल्ली : राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बनली असून त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार अधिक कठोर नियम करत आहे. देशाच्या आकडेवारीतही सर्वाधिक रूग्ण मुंबईत सापडल्याने ‘कम्युनिटी ट्रान्सफर’चे संकट गडद होत चालल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी अहोरात्र राज्य प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.


राज्यात गुरुवारी आणखी २१६ कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यातील सर्वाधिक १६२ रुग्णांची नोंद मुंबईत झाली. राज्यातील मृत्यूचा आकडा १०२ वर गेला; तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मृतांचा आकडा ६६ वर पोहोचला.
मुंबई व दिल्ली ही शहरे नवे हॉटस्पॉट ठरली आहेत. मुंबई शहर, उपनगर जिल्हा, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परदेश प्रवास न केलेल्या तसेच प्रत्यक्षात बाधितांच्या संपर्कात न आलेल्यांनाही बाधा होत असल्याने ‘कम्युनिटी ट्रान्सफर’चे संकट गडद झाले. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयातही बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी येत्या तीन ते चार दिवसांत रूग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केल्याने सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत.


जगात ९२ हजार मृत्यू
नवी दिल्ली : जगातील २११ देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १५ लाख ६८ हजारांकडे गेली असून आतापर्यंत ९२ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. एकट्या अमेरिकेतच कोरोनाने १५ हजार जणांचा बळी घेतला आहे. तिथे सुमारे ४ लाख ५० हजार रुग्ण आहेत. ज्या देशांत मृतांचे प्रमाण अधिक आहे त्यात इटली (१७,६७०), स्पेन (१५,२५०), फ्रान्स (१०, ९००), ब्रिटन (७,१००), इराण (४,११०) आणि चीन (३,३३५) यांचा समावेश आहे.

देशात रु ग्णांची संख्या ६,६५३
देशात गुरु वारी कोरोना रु ग्णांची संख्या ६,६५३ वर गेली तर बळींची संख्या २०९ वर पोहोचली. महाराष्ट्र, गुजरात, बिहार, ओडिशा, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, राजस्थान व पश्चिम बंगाल येथे नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आजवर १.३ लाख रु ग्णांचे नमुने तपासले आहेत. त्यातील पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण ३ ते ५ टक्के आहे.
४१,२६४ जणांचे अलगीकरण
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या
३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत बऱ्या झालेल्या १२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
तातडीच्या उपायांसाठी १५ हजार कोटी
नवी दिल्ली : कोरोनावरील तातडीच्या उपाययोजना व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी १५ हजार कोटींचे ‘कोरोना पॅकेज’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.
यातील ७,७७४ कोटी तातडीच्या खर्चासाठी, बाकीची रक्कम आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी पुढील एक ते चार वर्षांत ‘मिशन मोड’ पद्धतीने खर्च केली जाईल.
भविष्यात अशी वेळ पुन्हा आली तर आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी, हा या पॅकेजचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ही कल्पना मांडली होती.
राज्यात अतिजोखमीच्या आजाराचे मृत्यू सर्वाधिक
राज्यात कोरोनाबाधितांच्या २५ मृत्यूंपैकी १४ पुण्यातील, नऊ मुंबईतील, मालेगाव व रत्नागिरी येथील प्रत्येकी १ आहे. यात १५ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. २५ मृतांपैकी १२ जण ६० वर्षांवरील आहेत. तर मुंबईत मरण पावलेल्या एका महिलेचे वय १०१ आहे.
यातील ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वयोगटातील आहेत. तर दोघे ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांना ८४ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकार अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.

Web Title: CoronaVirus Worrying: Corona is spreading rapidly in Maharashtra including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.