CoronaVirus News: मुंबई, रायगडमध्ये डेल्टा प्लसमुळे दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:59 IST2021-08-13T06:58:36+5:302021-08-13T06:59:58+5:30
मुंबईत ११ डेल्टा प्लसचे रुग्ण होते, त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे डेल्टाचा पहिला बळी गेला आहे.

CoronaVirus News: मुंबई, रायगडमध्ये डेल्टा प्लसमुळे दोन जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पहिल्या बळीची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत ११ डेल्टा प्लसचे रुग्ण होते, त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे डेल्टाचा पहिला बळी गेला आहे.
याविषयी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, ५५ वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह रुग्ण फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या महिलेची २१ जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. २४ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र पालिकेकडे बुधवारी ११ ऑगस्ट रोजी ती महिला रुग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोविड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा कोविड अहवाल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवला होता. जीनोम सिक्वेसिंग अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह 00.१0 असल्याचे निदान करण्यात आले आहे.
नागाेठणे येथे काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा २२ जुलै राेजी मृत्यू झाला हाेता. हा रुग्ण डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित असल्याचे आता समाेर आले आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील अन्य रुग्णालाही डेल्टाचा संसर्ग झाला होता. मात्र, ती यातून पूर्ण बरी झाली आहे. विशेष बाब म्हणजे दाेन्ही रुग्णांचे काेविशिल्डचे दाेन्ही डाेस पूर्ण झाले हाेते. असे असतानाही त्यांना लागण झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जून, जुलै महिन्यांत काेराेनाचा प्रसार चांगलाच फाेफावला हाेता. राेहा तालुक्यातील नागाेठणे येथील एकाला काेराेनाची लागण झाली हाेती. त्यानंतर त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.