CoronaVirus News : अँटिजेन चाचणीला मर्यादा; फक्त ६ टक्के बाधितांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:29 IST2020-09-16T05:29:03+5:302020-09-16T06:29:34+5:30
आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या, त्यात सुमारे १ लाख अँटिजेन चाचण्या आहेत. सोमवारी एकूण १५,७०० चाचण्या करण्यात आल्या

CoronaVirus News : अँटिजेन चाचणीला मर्यादा; फक्त ६ टक्के बाधितांचा शोध
मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने अँटिजेन चाचणीवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिका दररोज ७ हजारांहून अधिक चाचण्या करीत आहे. परंतु, या चाचण्यांमधून बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण केवळ ६ टक्के असल्याने यातून रुग्ण शोधण्यात मर्यादा येत आहेत. त्याचवेळी आरटी-पीसीआर चाचणीमधून रुग्ण आढळण्याचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.
आतापर्यंत पालिकेने ९ लाखांच्या आसपास चाचण्या केल्या, त्यात सुमारे १ लाख अँटिजेन चाचण्या आहेत. सोमवारी एकूण १५,७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात अँटिजन चाचण्या ७,३०० होत्या. यात ४५० जणांचे कोरोना अहवाल बाधित दाखविले गेले. हे प्रमाण ६ टक्के इतके आहे. तर आरटी-पीसीआरच्या ८,४०० चाचण्यांमधून २,१०० रुग्णांचे अहवाल बाधित आले. हे प्रमाण तब्बल २५ टक्के आहे.
दिवसभरात ५१५ मृत्यू
राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०,४०९ झाली आहे. दिवसभरात २० हजार ४८२ नवीन रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.