Coronavirus in Mumbai: Mumbai has more patients recovering than diagnosed | Coronavirus in Mumbai: मुंबईत निदानापेक्षा रुग्ण बरे झालेल्यांची संख्या अधिक

Coronavirus in Mumbai: मुंबईत निदानापेक्षा रुग्ण बरे झालेल्यांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कठोर निर्बंधाच्या पाच दिवसांनंतर सोमवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. ही बाब मुंबईकरांना दिलासादायक आहे. शहर, उपनगरात दिवसभरात ७ हजार ३८१ रुग्ण आणि ५७ मृत्यूंची नोंद झाली. तर दिवसभरात ८ हजार ५८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ४ लाख ८६ हजार ६२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


मुंबईत ५ लाख ८६ हजार ६९२ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १२ हजार ४०४ वर गेला आहे. सध्या शहर, उपनगरात ८६ हजार ४१० रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत साेमवारी दिवसभरात ३६ हजार ५५६ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण ४९ लाख ८२ हजार ५३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्क्यांवर स्थिरावला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४७ दिवसांवर आला आहे.
शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १०६ आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १ हजार १७१ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २८ हजार ६५४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

मुंबईत कोरोनाची लाट स्थिर; पालिका
फेब्रुवारी माध्यान्हपासून मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सध्या स्थिर असल्याचे चित्र आहे. हा ट्रेंड असाच राहिल्यास कोरोनाची लाट ओसरली असे गृहीत धरता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.
१० एप्रिल राेजी  मुंबईत ९ हजार ३२७  इतके काेराेनाचे रुग्ण हाेते. १९ एप्रिलला ही संख्या ७,३८१ एवढी कमी झाली.  गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येत पुन्हा थोडी घट दिसून येत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता कोरोनाची लाट सध्या स्थिर असल्याचे दिसून येत असल्याचा अंदाज काकाणी यांनी व्यक्त केला.

राज्यात काेराेनाचे ५८ हजार ९२४ नवे रुग्ण, ३५१ मृत्यू
राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे किंचित दिलासादायक चित्र आहे. राज्यात दिवसभरात ५८ हजार ९२४ रुग्ण आणि ३५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ झाली असून बळींचा आकडा ६० हजार ८२४ झाला आहे. सध्या ६ लाख ७६ हजार ५२० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात सोमवारी ५२ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्के झाले असून मृत्युदर १.५६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख ७५ हजार ८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.१९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ४३ हजार ९६८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २७ हजार ८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus in Mumbai: Mumbai has more patients recovering than diagnosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.