Coronavirus: मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 08:59 AM2020-04-19T08:59:38+5:302020-04-19T09:00:34+5:30

ससूनमध्ये असणारे राजकीय हस्तक्षेप थांबवले गेले.

Coronavirus: MNS Pune wrote letter to CM Uddhav Thackeray on Dr Ajay Chandanwale transfer from Sasoon pnm | Coronavirus: मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Coronavirus: मग हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का?; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्या वर पोहचली आहे तर २०० जणांचा मृत्यू झाला आहे. यातच मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९०० च्या आसपास पोहचली आहे.

पुण्यात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले  गुरूवारी शासनाने तडकाफडकी बदली केल्यानंतर रुग्णालयातील अनेकांना धक्का बसला. या बदलीविरोधात डॉक्टर, कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. ही बदली रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण असल्याचं समोर येत आहे.

मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करुन डॉ. मुरलीधर तांबे यांची नियुक्ती केली. या बदलीमागे स्थानिक राजकारण असून सत्तेतील एका पक्षाला खूश करण्यासाठी ही बदली केली त्यातून राजकीय बळी देण्यात आला असा आरोप मनसेने केला आहे.

तसेच ससूनमध्ये असणारे राजकीय हस्तक्षेप थांबवले गेले. त्याठिकाणी चाललेल्या गैरप्रकाराला थांबवल्यामुळे स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी यांचा डॉ. अजय चंदनवाले यांना विरोध होता. त्यामुळे चंदनवाले यांची बदली करण्यासाठी त्यांना एक निमित्त हवं होतं. कोरोनामुळे ससूनमध्ये होणारे मृत्यू हे निमित्त काढून तात्काळ डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीची शिफारस करुन त्यांना पदावरुन हटवण्यात आले. चंदनवाले यांच्या बदलीसाठी मनसे भांडतंय असं नाही. पण कोणा एका राजकीय पक्षाला वाटतंय आम्हाला हवं तेव्हा अधिकाऱ्यांना काढून टाकू त्याचा परिणाम त्या क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार आहे असंही मनसेने म्हटलं आहे.

दरम्यान, स्वत:च्या जीवाशी खेळून ही डॉक्टरमंडळी रुग्णांचा जीव वाचवत आहे. अशा परिस्थितीत एकाधिकारी शाहीने वागत अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही हुकूमशाहीकडे जाणारी वाटचालच म्हणावी लागेल असं मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे डॉ. चंदनवाले बदली करुन सत्तेतील कोणत्या पक्षाला राजकीय स्वार्थ साधायचा आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो.

Web Title: Coronavirus: MNS Pune wrote letter to CM Uddhav Thackeray on Dr Ajay Chandanwale transfer from Sasoon pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.