CoronaVirus News: 'मिशन बिगिन अगेन'च्या नियमांत महत्त्वाचा बदल; लाखो नागरिकांचा प्रवास होणार सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 16:39 IST2020-06-04T16:38:25+5:302020-06-04T16:39:38+5:30
खासगी कार्यालयं दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याच्या परवानगीतही बदल

CoronaVirus News: 'मिशन बिगिन अगेन'च्या नियमांत महत्त्वाचा बदल; लाखो नागरिकांचा प्रवास होणार सुलभ
मुंबई: ठाकरे सरकारनं मिशन बिगिन अगेनमध्ये जारी केलेल्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. आता मुंबई महानगर भागात (एमएमआर) कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार आहे. याशिवाय खासगी कार्यालयं दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याच्या परवानगीतही बदल केला गेला आहे. आता १० टक्के उपस्थिती किंवा १० कर्मचाऱ्यांची उपस्थिती, यापैकी जो आकडा असेल जास्त असेल, तितक्या क्षमतेनं खासगी कार्यालयं ८ जूनपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विद्यापीठं, महावद्यालयं आणि शाळा यातील शिकवण्याचं काम सोडून इतर कामांसाठी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवता येणार असल्याचं नव्या नियमात नमूद करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारनं देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनंही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली. राज्य सरकारनंही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार आहेत. राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल्स-हॉटेल आणि मंदिरं बंदच ठेवली जाणार आहेत.
३ जूनपासून लागू झालेल्या सवलती-
१. घराबाहेरील व्यायामासाठी परवानगी. समुद्र किनारे, खाजगी/सार्वजनिक मैदाने, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग/धावणे/ जॉगिंगला काही अटींवर परवानगी. मैदानावरील व्यायामासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट. सामूहिक हालचालींना परवानगी नाही. मात्र मोकळ्या मैदानात गर्दी करता येणार नाही.
२. प्लंबर, ईलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल, आणि इतर तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना कामे करता येतील. त्यासाठी मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे बंधनकारक.
३. गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये ग्राहकाच्या पूर्व सूचनेनुसार वाहनांची दुरूस्ती
४. सर्व शासकीय कार्यालयांत १५ टक्के कर्मचारी अथवा १५ कर्मचारी (जी संख्या जास्त असेल त्यानुसार) काम करतील.
५. मॉल आणि शॉपिंग काँम्पलेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकाने सकाळी ९ ते ५ वेळेत सम-विषम नुसार उघडी राहतील.
६. कपड्याच्या दुकांनामधील ट्रायल रूम बंद. तसेच एक्सचेंज आणि माल परत करण्याचे धोरण अथवा सुविधा बंद
७. केवळ खरेदीसाठी चारचाकी वाहने घराबाहेर काढण्याला बंदी.
८. विनाकारण लांब पल्ल्याचा प्रवास करण्यावर बंदी.
जगात भारी! जगातील सर्वात मोठं कडीपत्त्याचं झाड; भारतीय शेतकऱ्याचं नाव गिनीज बुकात
अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार