CoronaVirus Marathi News 87 year old doctor braves covid 19 pandemic to treat people | महाराष्ट्रातला देवमाणूस! वयाच्या 87व्या वर्षी अनवाणी सायकल चालवून कोरोनाच्या संकटात करताहेत रुग्णसेवा

महाराष्ट्रातला देवमाणूस! वयाच्या 87व्या वर्षी अनवाणी सायकल चालवून कोरोनाच्या संकटात करताहेत रुग्णसेवा

मुंबई - कोरोनाने देशात थैमान घातले आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 77,61,312 वर पोहोचला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. 

कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा करता यावी यासाठी वयाच्या 87व्या वर्षी एका डॉक्टर आजोबांनी अनवाणी सायकल चालवून गरीब लोकांसाठी पुढाकार घेतला आहे. दररोज 10 किलोमीटर सायकलने प्रवास करत दारोदारी जाऊन ते गरीब लोकांना मदत करत आहेत. गरजुंवर उपचार करत आहेत. डॉ. रामचंद्र दांडेकर असं या महाराष्ट्रातील देवमाणसाचं नाव असून ते कोरोनाच्या या काळात रुग्णांची न थकता, न थांबता सेवा करत आहेत. दांडेकर आजोबा हे एक होमिओपॅथी डॉक्टर आहेत. 

अनवाणी सायकल चालवून कोरोनाच्या संकटात करताहेत रुग्णसेवा

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 60 वर्षांपासून डॉ. रामचंद्र दांडेकर रुग्णांची सेवा करत आहेत. चंद्रपुरातल्या मूळ, पोम्भुर्णा आणि बल्लारशा या तीन तालुक्यांमधील गावात राहणाऱ्या लोकांपर्यंत ते मदतीसाठी पोहचतात. खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरजू लोकांपर्यंत लवकर मदत पोहोचावी. त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी दांडेकर आजोबा सतत प्रयत्नशील असतात. दररोज ते आपल्या सायकलने अनवाणी फिरून गरीबांना मदत करत आहेत. ते दारोदारी जाऊन गरीब लोकांवर उपचार करतात. त्यांना औषधं देतात. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी त्यांचं हे कार्य सुरूच ठेवलं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी डॉक्टर आजोबा करत असलेल्या कामाला सर्वांनीच सलाम केला आहे. 

कोरोनाच्या काळात अनेकांनी गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशीच एक नर्स जंगलातून जाऊन रुग्णांचा जीव वाचवता यावा यासाठी मोफत औषधं देत आहे. मुदगली तिर्की असं या 55 वर्षीय नर्सचं नाव असून त्या अनेक वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्या गावकऱ्यांना मदत करत आहे. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील सूर गावात त्या कार्यरत आहेत. लोकांपर्यंत औषध पोहचवता यावीत यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या संकटातही त्या जंगलातून पायी अंतर पार करत गावोगावी जात आहेत. तेथील लोकांना आवश्यक असलेली सर्व मदत करत आहेत. फक्त औषधंच नाही तर इतरही अनेक जीवनावश्यक वस्तू त्या गावकऱ्यांना देत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News 87 year old doctor braves covid 19 pandemic to treat people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.