Coronavirus: कोरोनामुळं आईवडील गमावलेत, मुलं पोरकी झालेत; दत्तक घेण्याचा विचार करताय? थांबा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:10 PM2021-05-04T14:10:27+5:302021-05-04T14:16:38+5:30

राज्यात कोठेही कोविड-19 च्या कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा

Coronavirus: Maharashtra Government warns illegal adoption of child whos parents died due to Corona | Coronavirus: कोरोनामुळं आईवडील गमावलेत, मुलं पोरकी झालेत; दत्तक घेण्याचा विचार करताय? थांबा, अन्यथा...

Coronavirus: कोरोनामुळं आईवडील गमावलेत, मुलं पोरकी झालेत; दत्तक घेण्याचा विचार करताय? थांबा, अन्यथा...

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देणे- घेणे कायद्याने गुन्हाकोविडमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायपणाचा फायदा घेणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईमहिला आणि बालविकास विभाग सतर्क. कारवाई करण्याचा इशारा

मुंबई – राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेकांनी आपल्या घरातलं माणूस गमावलं आहे. काही ठिकाणी तर आई-वडील दोघांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने मुलं पोरकी झाल्याच्या बातम्या येत आहेत. यातच सोशल मीडियावर अशा मुलांना दत्तक घेण्याची इच्छा करणाऱ्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

कोविड-19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्रच्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) 8329041531 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केलं आहे. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने कळवले आहे.

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविड-19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यू मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात असून बालके दत्तकास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे- देणे वा खरेदी-विक्री केली करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार कठोर कारवाई कारवाईस पात्र आहे.

राज्यात कोठेही कोविड-19 च्या कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्र (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) च्या 8329041531 या क्रमांकावर कळवावे. तसेच  प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात द्यावे. त्याची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल.

ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळवले आहे.

Web Title: Coronavirus: Maharashtra Government warns illegal adoption of child whos parents died due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.