CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:20 AM2021-04-07T01:20:10+5:302021-04-07T01:20:31+5:30

.... अन्यथा शुक्रवारपासून व्यापार सुरू

CoronaVirus Lockdown News: Traders give government two-day ultimatum | CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

Next

मुंबई : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात याचा निषेध करुन फेरविचार करण्यासाठी राज्य सरकारला दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच काही झाले तरी येत्या शुक्रवारपासून दैनंदिन व्यापार, व्यवहार सुरळीत ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख राजेंद्र बाठीया, ‘केमीट’चे चेअरमन मोहन गुरनानी, यांच्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, मराठवाडा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी आदी जिल्ह्यांतील व्यापारी संघाचे प्रमुख सहभागी झाले होते.

राज्यभरातील व्यापारी संघांच्या प्रमुखांनी ‘विकएण्ड लॉकडाऊन’च्या नावाखाली ‘पूर्ण लॉकडाऊन’ करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप करून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करून कोणत्याही परिस्थितीत व्यापारी सहभागी होणार नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरने राज्य शासनाशी चर्चा करावी व हा आदेश तत्काळ दुरुस्त करून घ्यावा व व्यापार सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी एकमुखाने केली.

राज्य शासनाला ठरावाची प्रत  
सर्व सूचनांचा विचार करून, यासंबंधी राज्य शासनाला दोन दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे घेण्यात आला. राज्य शासनाला यासंदर्भातल्या ठरावाची प्रत पाठवून गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास, शुक्रवारपासून राज्यभरातील सर्व व्यापारी कोरोना प्रतिबंधाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपापले व्यवसाय सुरू करतील, असा इशाराही सरकारला देण्यात आला.
उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्याचा आढावा ललित गांधी यांनी घेतला. राज्यभरातल्या व्यापारी संघाने दिलेली ही जबाबदारी महाराष्ट्र चेंबर समर्थपणे पार पडेल, अशी ग्वाही सर्वांना दिली.

Web Title: CoronaVirus Lockdown News: Traders give government two-day ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.