CoronaVirus: Lettermark for 10th and 12th results due to lockdown; Answer sheet right at school | CoronaVirus : लॉकडाउनमुळे १०वी-१२वीच्या निकालांना लागणार लेटमार्क; उत्तरपत्रिका शाळेतच

CoronaVirus : लॉकडाउनमुळे १०वी-१२वीच्या निकालांना लागणार लेटमार्क; उत्तरपत्रिका शाळेतच

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्याचा फटका १०वी- १२वीच्या निकालांनाही बसण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षकांना १०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्याचे निर्देश अटीशर्ती घालून देण्यात आले आहेत. आधीच संचारबंदी आणि त्यात लॉकडाउन लागू झाल्याने १०वीच्या जवळपास लाखो उत्तरपत्रिका या शाळेमध्ये अडकून पडल्या आहेत.
शिक्षकांना पेपर कलेक्शनसाठी पर्यायच उपलब्ध राहिला नाही, त्यात आधीच काही शिक्षक गावी पोहोचले आहेत. या परिस्थितीत जोपर्यंत संचारबंदी उठून शिक्षक हे पेपर्स येऊन गोळा करणार नाहीत व तोपर्यंत निकाल लागणे शक्य नाही. त्यामुळे निश्चितच यंदा दहावी-बारावीच्या निकालांना लेटमार्क लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वेळापत्रकानुसार १ मार्च ते २३ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा नियोजित होती. मात्र, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ मार्च रोजी होणारा दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलल्याने हा पेपर संचारबंदी मागे घेतल्यानंतर त्याबाबतची तारीख सांगितली जाणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षक संघटनांनी दहावीच्या उत्तरपत्रिका या आधी घरी देण्यात याव्यात आणि वर्क फ्रॉम होमद्वारे या उत्तरपत्रिका तपासण्याचे शिक्षकांना आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. संचारबंदीमुळे शिक्षकांना प्रवास करणे अवघड झाल्याने सर्वच विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळेत, केंद्रावर अडकून पडल्या आहेत. जर या उत्तरपत्रिका आधीच शिक्षकांना पुढच्या परिस्थितीचा विचार करून घरी तपासण्यासाठीचे नियोजन केले असते, तर या प्रश्नपत्रिका तपासण्याचे काम शिक्षक घरी करू शकले असते आणि हा गोंधळ झाला नसता, असे अंधेरीच्या हंसराज मोरारजी हायस्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.

तपासणी प्रक्रियेचे अनेक टप्पे
नियमानुसार दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र आता शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी विलंब होणार असून शिक्षकांनी हे पेपर तपासल्यानंतर नियमकाकडे (मॉडरेटर) जातात आणि त्यानंतर गुणपत्रक तयार केले जातात. मग निकाल लागतो अशी प्रक्रिया असल्याने निकालाला लेटमार्क लागणे निश्चित असल्याचे मत एका शिक्षकाने व्यक्त केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Lettermark for 10th and 12th results due to lockdown; Answer sheet right at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.