Coronavirus : भारतीयांना त्वरित लस मिळावी म्हणून आर्थिक जोखीम उचलली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 06:09 IST2020-04-26T06:07:57+5:302020-04-26T06:09:33+5:30
भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.

Coronavirus : भारतीयांना त्वरित लस मिळावी म्हणून आर्थिक जोखीम उचलली!
सुकृत करंदीकर
पुणे : इंग्लंडमधील आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कोविड-१९ वरील लशीचे संशोधन चालू आहे. या लशीच्या मानवी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. या लस संशोधनाला ८० टक्के यश मिळण्याची खात्री ‘आॅक्सफर्ड’ला वाटते. ही शक्यता गृहीत धरुन तातडीने लस उत्पादन करण्यासाठी मोठी आर्थिक जोखीम उचलण्यास ‘सिरम’ तयार झाली. भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे असणारी उच्च दर्जाची उत्पादन क्षमता लक्षात घेऊन ‘आॅक्सफर्ड’ने या लशीच्या भारत आणि भारताबाहेरील उत्पादनाचे हक्क ‘सिरम’ला दिले आहेत. ‘सिरम’ ही दीड अब्जांपेक्षा जास्त लशींची निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
>लस यशस्वी ठरल्यानंतरदेखील त्याचे उत्पादन घेण्यास पुढील सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागतो. हा वेळ वाया जाऊ नये, यासाठी आतापासूनच निर्मिती व्यवस्था उभी करत आहोत.
कोरोनावरील लस उत्पादनासाठी नवी उत्पादनक्षमता निर्माण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही करत आहोत.
कोडोजेनिक्स या अमेरिकी कंपनीसोबत लशीचे स्वतंत्र संशोधन सुरू आहे. यातून २०२१ पर्यंत लस बाजारात आणण्यात आम्ही यशस्वी होऊ. आमच्या या संशोधनाचे पेटंट आम्ही घेणार नाही.
>कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूवरील लशीचे उत्पादन येत्या आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत भारतात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ५० लाख लशींचे उत्पादन दोन आठवड्यांच्या आत करण्याची ‘सिरम’ची क्षमता आहे. पुढच्या सहा महिन्यांत ही क्षमता दुपटीने वाढवता येईल.
- अदर पूनावाला