Coronavirus: केंद्राच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' परिपत्रक खोटं; उद्यापासून ८ दिवस कोणतीही सुट्टी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 21:37 IST2020-03-13T20:59:14+5:302020-03-13T21:37:23+5:30
उद्यापासून आठ सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं परिपत्रक खोटं; सायबरकडून तपास सुरू

Coronavirus: केंद्राच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' परिपत्रक खोटं; उद्यापासून ८ दिवस कोणतीही सुट्टी नाही
मुंबई: कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.|
केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले हे परिपत्रक खोटे; केंद्र शासनाच्या 'अशा' कुठल्याही सूचना नाहीत; यासंदर्भात सायबर पोलिसांकडे शासनातर्फे तक्रार दाखल, तपास सुरू. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात. pic.twitter.com/pcAsaZweVl
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 13, 2020
व्हायरल पत्रात नेमकं काय?
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १४ मार्च २०२० ते २१ मार्च २०२० या काळात सुट्टी जाहीर केली आहे. दहापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कार्यालयांना या कालावधीत सुट्टी द्यावीच लागेल. राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांनादेखील हा आदेश लागू असेल. या आदेशाचं उल्लंघन केल्यास ५ हजारांचा दंड ठोठावण्यात येईल, असा मजकूर व्हायरपल झालेल्या पत्रात आहे.